गोंदिया : अपक्ष आमदार तसेच चाबी संघटनेचे प्रमुख विनोद अग्रवाल यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी मागील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी निलंबित केले होते. आता त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अग्रवाल यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे समाज माध्यमावर जाहीर केले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल, अशी लढत होण्याची चिन्हे आहे.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यावेळी काँग्रेसमधून आयात केलेल्या माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अवहेलना केल्यामुळे त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांची भाजप पक्षश्रेष्ठींशी पुन्हा जवळीक वाढली. यामुळे आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात आल्याने गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. परिणामी विनोद अग्रवाल यांच्यासाठी भाजपची दारे आपसुकच उघडी झाली.
आणखी वाचा-Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक
निलंबन मागे घेण्यात आल्याने विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांनाच आगामी निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी चिन्हे आहे. काँग्रेसकडूनही गोपालदास अग्रवाल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्येच थेट लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. अशीच लढत २०१४ मध्येही झाली होती. त्यावेळी गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) यांनी विनोद अग्रवाल (भाजप) यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल (अपक्ष) यांनी गोपालदास अग्रवाल (भाजप) यांचा पराभव केला होता.
पक्षप्रवेशापेक्षा निलंबन मागे घेणे सोयीचे
विनोद अग्रवाल यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे, अशी इच्छा भाजपच्या स्थानिक नेत्यांची होती. मात्र, अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांचा याला विरोध होता. यावर तोडगा काढत भाजप पक्षश्रेष्ठींनी विनोद अग्रवाल यांचा पक्षप्रवेश करण्याऐवजी निलंबन मागे घेण्यात तत्परता दाखवली.