चार राज्यांच्या निकालांवरून उत्तर भारत किंवा हिंदी भाषक पट्ट्यात भाजपने आपली पकड कायम ठेवली आहे. कर्नाटकनंतर तेलंगणातील आघाडीमुळे दक्षिण भारतात काँग्रेसचे वर्चस्व वाढले आहे. विधानसभा निकालांमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. छत्तीसगडमध्येही भाजपने आघाडी घेतली होती. यावरून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भाजपने आपली पकड कायम ठेवल्याचे स्पष्ट होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चार राज्यांचा निकाल भाजपसाठी निश्चित फायदेशीर ठरणारा आहे. कारण उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आदी उत्तर भारतातील राज्यांमध्ये २०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आहेत. या राज्यांमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा लाभच होईल. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून, नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्र असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान आहे. त्यातच जातनिहाय जनगणनेचा नितीशकुमार अधिक राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करतील. पण हिंदी भाषक पट्ट्याचा कौल भाजपच्या बाजूने असल्यास बिहारमध्येही लोकसभा निवडणुकीत चित्र फार वेगळे नसेल, असे राजकीय जाणकरांचे मत आहे.
हेही वाचा… अजित पवार गटाचे मोहरे टिपण्यासाठी शरद पवार गटाची मोर्चेबांधणी
काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगड ही हिंदी पट्ट्यातील दोन महत्त्वाची राज्ये गमवावी लागतील, असे प्राथमिक निकालांचा कौल लक्षात घेता चित्र आहे. तेलंगणात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील तेलंगणा हे दुसरे राज्य काँग्रेसला मिळेल, असा प्राथमिक कौल तरी दर्शवित होता. उत्तरेत भाजप तर दक्षिणेत काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेतील लोकसभेच्या जागा कमी आहेत. दक्षिण भारतात लोकसभेच्या १२८ जागा आहेत. याशिवाय दक्षिण भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे प्रस्थ आहेत. याउलट उत्तर भारतात भाजपचे पूर्णपणे वर्चस्व आहे.
कर्नाटकात लोकसभेच्या २८ तर तेलंगणात १७ जागा आहेत. याचाच अर्थ काँग्रेस प्रभावी असलेल्या दक्षिणतील दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या ४५ जागा आहेत. याउलट भाजपचे प्रस्थ असलेल्या हिंदी भाषक पट्ट्यात किंवा उत्तर आणि पश्चिम भारतात लोकसभेच्या ३००च्या आसपास जागा आहेत. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला वातावरण अनुकूल मानले जाते.