मुंबई : लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत चिन्हाच्या घोळाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. मतदारांचा तुतारी आणि ट्रॅम्पेट या चिन्हांमध्ये गोंधळ उडाल्याचे निकालानंतर समोर आले आहे. चिन्हाच्या नामसाधर्म्याने शरद पवार गटाचे नऊ उमेदवार पराभूत झाले.
विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८६ जागा लढवल्या होत्या. पैकी १० उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले होते. लोकसभा निवडणुकीत ‘ट्रम्पेट’चे भाषांतर पिपाणी करण्यात आले होते. त्याचा दोन मतदारसंघांत पवार गटाला फटका बसला होता.
हेही वाचा >>>Nana Patole Election Result : कॉंग्रेसमध्ये नशीबवान समजले जाणारे नाना पटोले यांच्या कारकिर्दीला ग्रहण
त्यानंतर पक्षाने ट्रम्पेट चिन्ह गोठवावे अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. आयोगाने ती फेटाळली. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विधानसभेला अनेक अपक्षांनी ट्रम्पेटची मागणी केली होती. तब्बल १६३ मतदारसंघांत ट्रम्पेट हे चिन्हे देण्यात आले होते.
‘ट्रम्पेट’मुळे माझा विजय वळसे पाटील
आंबेगाव मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील निवडून आले. वळसे पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्याला ‘ट्रम्पेट’ चिन्हाने घेतलेल्या मतांचा लाभ झाल्याची कबुली दिली.
फटका कुठे बसला?
● जिंतूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांचा ४५५४ मतांनी पराभव झाला. ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना ७४३० मते मिळाली.
● घनसावंगी मतदारसंघातील शरद पवार गटाच्या राजेश टोपेंचा पराभव २३०९ मतांनी झाला. ट्रॅम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला ४८३० मते मिळाली.
● शहापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांचा १६७२ मतांनी पराभव झाला.येथे ट्रॅम्पेट चिन्हाच्या उमेदवाराला ३८९२ मते मिळाली.
● बेलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांचा ३७७ मतांनी पराभव झाला. तिथे ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या प्रफुल म्हात्रे यांना २८६० मते मिळाली.
● अणुशक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाहद अहमद यांचा ३३७८ मतांनी पराभव झाला. येथे ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांना ४०७५ मते मिळाली.
● आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे निवडून आले आहेत. येथे देवदत्त शिवाजीराव निकम नावाच्या एका दुसऱ्या उमेदवाराला २९६५ मते मिळाली ज्याचे निवडणूक चिन्ह ट्रॅम्पेट होते.
● पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राणी लंके यांचा १५२६ मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ दाते निवडून आले, तर ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या सखाराम सारक यांना ३५८२ मते मिळाली.