अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून अस्वस्थ असलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी राजकीय पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुजय विखे यांच्या या प्रयत्नांना, त्यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ‘श्रद्धा व सबुरी’चा सल्ला दिला असला तरी त्यांनीही विखे यांना थेट राज्यसभेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. जिल्ह्यातील भाजपसह महायुतीच्या आमदारांनी सुजय विखे यांचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यातील दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. त्यानंतर मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने १२ पैकी १० जागांवर घवघवीत यश मिळवले. ‘जिरवाजिरवी’चे प्रयत्न न झाल्याने सन २०१९ ची भाजपमधील पुनरावृत्ती टळली. जिल्हा महायुतीमय झाला. या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह या १० ही आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. याच सत्कार समारंभाचे औचित्य साधत माजी खासदार सुजय विखे यांनी त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आणला. आमदार कर्डिले हे मंत्री विखे- सभापती शिंदे यांच्यामध्ये दुवा साधणारे म्हणून ओळखले जातात. तिघेही व्यासपीठावर असल्याची संधी साधत सुजय विखे यांनी आपल्या राजकीय पूर्नवसानाचा मुद्दा उपस्थित केला.

कार्यक्रमात सर्वच विद्यमान आमदार उपस्थित असताना माझ्यासारख्या ‘माजी’चा विचार करा, पुनर्वसनाचा विचार करा, त्यासाठी कर्डिले-शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असेही सुजय विखे यांनी सुचवले. अन्यथा मी केवळ भाषणापुरताच राहील, लोक मला विसरून जातील, असाही गमतीने त्यांनी उल्लेख केला तरी राजकीय पूर्नवसानाची इच्छा त्यांनी लपवून ठेवली नाही. दुष्काळी भागाच्या सकाळाई पाणीयोजनेच्या मान्यतेने अनुकूल वातावरण तयार झालेले असतानाच सुजय विखे यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा पुढे आणला आहे.

तसे राम शिंदे यांचेही विधानसभेतील लागोपाठ दोन पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम विधान परिषदेचे आमदार म्हणून व नंतर सभापती पदावर पुनर्वसन झालेलेच आहे. त्याला कारणही आमदार शिवाजी कर्डिले हेच ठरले आहेत. सन २०१९ मधील पराभवानंतर त्यांनी राम शिंदे यांची विधान परिषदेवर नियुक्ती व्हावी यासाठी मागणी व ठराव करण्यात पुढाकार घेतला होता. हाच धागा पकडून कर्डिले यांनीही कार्यक्रमात सुजय विखे यांचा माजी ऐवजी ‘सध्याचे खासदार’ असा उल्लेख करत पूनर्वसनाच्या मागणीला सहमती दर्शवली.

पराभव झाला तरी साकळाई पाणीयोजना वाऱ्यावर न सोडता ती मार्गी लावण्याचे सुजय विखे यांचे प्रयत्न कसे सुरु आहेत, याची माहिती देत सुजय यांचे वडील तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यास पाठिंबा दर्शविला. त्याच मुद्यावर आमदार कर्डिले यांनीही सुजय विखे आमच्यासाठी खासदारच आहेत असे स्पष्टीकरण कर्डिले यांनी दिले. या वातावरण निर्मितीमुळे भाजपचे आमदार मोनिका राजळे व विक्रम पाचपुते, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे व काशिनाथ दाते यांनीही सुजय विखे यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी उचलून धरली.

त्याचबरोबर जिल्ह्यात दहा आमदार निवडून आले असले तरी सुजय विखे यांच्या पराभवामुळे जिल्ह्याची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ असे सांगत विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय विखे पिता-पुत्रांना दिले. सभापती राम शिंदे यांनीही सुजय विखे यांच्या मागणीला पाठिंबा देताना सुजय यांनी आपल्यासारखी श्रद्धा व सबुरी ठेवावी असा सल्ला दिला. त्याचीच चर्चा अधिक रंगली आहे.