रवींद्र जुनारकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानिमित्ताने स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दाखवलेला उत्साह त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात दिसला नाही. पवार यांचे फलक शहरात सर्वत्र झळकत होते, तर पटोलेंचे शोधावे लागत होते. काँग्रेसमधील या उत्साहाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

विरोधी पक्षनेते पवार महापुराच्या निमित्ताने चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या मागोमाग काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही या दोन जिल्ह्यांचा दौरा केला. पवार व पटोले या दोन्ही नेत्यांचे पूरग्रस्त भागांचे दौरे काँग्रेसच्या उत्साहामुळे चर्चेत आले. विशेष म्हणजे, पवार यांच्या दौऱ्यात काँग्रेस नेत्यांचा उत्साह ओथंबून वाहताना दिसत होता, तर पटोलेंच्या दौऱ्यात या उत्साहाची धार थोडी कमी झाली होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अजित पवार यांचे अक्षरश: ‘अपहरण’च केल्याचे चित्र पाहायला मिळाले. पवार यांच्या स्वागतात माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे एकमेव नेते सोडले तर अख्खी काँग्रेस सेवेत होती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक नेतेमंडळी मागे होती. पवार यांनीही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना दुय्यम स्थान देत काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना व नेत्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, राजुराचे आमदार सुभाष धोटेही पवारांसोबत काही ठिकाणी हजर होते.

हेही वाचा… कोल्हापूरातील निस्तेज शिवसेनेत चैतन्य जागवण्याचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान

याउलट चित्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात दिसून आले. पटोलेंच्या स्वागताचे फलक शहरात शोधावे लागत होते. बोटावर मोजण्याइतके फलक दिसत होते. पटोले रात्री उशिरा चंद्रपुरात दाखल झाले. त्यानंतर सकाळी नऊ वाजता राजुरा या पूरग्रस्त भागात गेले. तिथे त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. त्यांच्या ठरलेल्या दौऱ्यानुसार दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होती. मात्र, राजुरा व बल्लारपुरातील काँग्रेस नेत्यांनी पटोले चंद्रपुरात वेळेत पोहचणार नाहीत, अशीच जणू व्यूहरचना आखली होती. परिणामी, पटोले चार वाजता चंद्रपुरात आले. त्यामुळे एक वाजताची त्यांची पत्रकार परिषद चारनंतर सुरू झाली. वेळ चुकल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह दिसला नाही. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्याच मतदारसंघात पटोले यांनी पाहणी केली. एकूणच या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यात काँग्रेस नेत्यांनी पवार यांना झुकते माप तर पटोले यांना कमी महत्त्व दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा… सोलापुरात काँग्रेसची बुडती नौका वाचवताना प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाचा कस

काँग्रेस विरुद्ध काँग्रेस

पटोले यांच्या दौऱ्यानिमित्ताने काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले. काँग्रेस नेत्यांनी भाजपसोबत दोन हात करण्याऐवजी स्वपक्षीयांविरोधातच आघाडी उघडल्याचे चित्र पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू धोटे यांनी फलक लावले म्हणून वाद झाला. महिला काँग्रेसमध्येही धुसफूस सुरूच आहे. त्यामुळे हा पक्ष आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवुडणुकीत भाजपशी लढणार की काँग्रेसविरोधात काँग्रेसच लढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वडेट्टीवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय

विरोधी पक्षनेते पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार गैरहजर होते. वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्याचा सिरोंचापासून आरमोरीपर्यंत स्वतंत्र दौरा केला. याचबरोबर, त्यांनी राजुरापासून तर चंद्रपूरपर्यंतही पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यातील वडेट्टीवार यांची अनुपस्थिती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At ajit pawar flood affected area visit congress welcomes him more enthusiasm than congress state president nana patole print politics news asj