काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केल्यामुळे सोमवारी दुपारी बारा वाजता काँग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत त्यांचे जंगी स्वागत केले. पक्षाचे सभागृहातील उपनेते गौरव गोगोई वगैरे सदस्य ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणा देत सभागृहात आले. ‘इंडिया जोडो-इंडिया जोडो’ची घोषणाबाजी सर्वच विरोधी पक्ष सदस्यांनी सुरू केली. सभागृहात अचानक झालेल्या ‘इंडिया-इंडिया’च्या नारेबाजीमुळे सत्ताधारी भाजपचे सदस्य हबकून गेले होते.

विरोधकांच्या बाकावरून ‘इंडिया’चा घोष होत असताना, सत्ताधारी काही क्षण शांत बसून होते. त्यांना नेमके कसे प्रत्युत्तर द्यावे हेच कळत नव्हते. भाजपचे काही सदस्य तर राहुल गांधींकडे बघण्यात गर्क होते. ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणेबाजीला पर्यायी घोषणा काय, हे अजून भाजपने निश्चित केलेले नाही. वास्तविक, भाजपला पर्यायी शब्द सापडलेला नाही. त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी ‘भारत माते’चा आधार घेतला. ‘इंडिया’च्या घोषणाला ‘भारत माता की जय’ अशा भाजप सदस्यांच्या गर्जनेने लोकसभेचे सभागृह दणाणून टाकले!

हेही वाचा – कमी वयात मोठी जबाबदारी सांभाळणारे प्रदीप सिंह वाघेला यांचा तडकाफडकी राजीनामा; गुजरात भाजपामध्ये खळबळ

केंद्र सरकारने नऊ वर्षांमध्ये विविध योजनांमधून ‘इंडिया’ हा शब्द प्रचलित केला होता. पण, तो विरोधकांच्या महाआघाडीने बळकावला असल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. दिल्ली संदर्भातील विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या महाआघाडीचा ‘इंडिया’ असा उल्लेख करण्याचे जाणीवपूर्वक टाळले होते. विरोधकांचा उल्लेख ‘इंडिया’ असा न करता ‘यूपीए’ करण्याचे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत. त्यामुळे केंद्रीयमंत्री अमित शहा यांनीदेखील शुक्रवारी विरोधकाच्या भ्रष्टाचाराचा संदर्भ देताना ‘यूपीए’ असा उल्लेख केला होता.

हेही वाचा – “न्याय आणि लोकशाहीचा विजय”, राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळाल्यानंतर काँग्रेसकडून जल्लोष साजरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एनडीए’च्या खासदारांच्या राज्यनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये ‘इंडिया’ला उत्तर कसे द्यायचे यावर चर्चा करण्यात आली होती. ‘इंडिया’ या शब्दावरून विरोधकांची टिंगल केली तर स्वतःची मस्करी केल्यासारखे दिसेल. ही नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा ‘इंडिया’ हा शब्दच वापरू नये, अशा सूचना भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पर्यायी शब्दावर शिक्कामोर्तब होईपर्यंत ‘भारत माता की जय’ ही घोषणा भाजपकडून दिली जात असल्याचे दिसते.