Atal Bihari Vajpayee vs Lalu Prasad Yadav : बिहारचं नाव घेतलं, तरी लालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांसारख्या दिग्गज राजकारण्यांची नावं आठवतात. गेल्या काही वर्षांत तेजस्वी यादव आणि भाजपा नेत्यांनीही बिहारच्या राजकारणावर चांगलीच छाप सोडली आहे. दोन दशकांपासून राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची सत्ता आहे. कधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर कधी महायुतीची मदत घेऊन नितीश हे बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचं बिहारच्या सत्तेवर निर्विवाद वर्चस्व होतं. परंतु, भाजपाचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका भाषणामुळे बिहारमधील लालूंच्या सत्तेला सुरुंग लागला.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवून भाजपाला पराभवाचा धक्का दिला. भाजपाचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं. पुढच्याच वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. तेव्हा वाजपेयींनी बिहार गाठलं आणि भाजपाच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सुरू केला. त्यावेळी पाटण्यात किसलय गुप्ता या १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. अपहरणकर्त्यांचा शोध लागत नसल्याने राबडी देवी (लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी) यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी सरकारवर टीकेची झोड उठली.
अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते?
२७ जानेवारी २००५ रोजी वाजपेयींनी भागलपूरमधील एका प्रचारसभेत ‘मेरा किसलय कहाँ है’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सर्वसामान्यांचं लक्ष वेधलं गेलं. अपहरणाच्या घटनांबद्दल जनतेत जागरूकता वाढली आणि राज्य सरकारवरील दबाव वाढला. १० दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून किसलयची सुटका केली. मात्र, या घटनेनंतर २००५ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि त्याच्या सहयोगी पक्षांना पराभवाचा हादरा बसला. त्यामुळे लालू-राबडी सरकारची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. तेव्हापासून लालू प्रसाद यादव यांना बिहारमध्ये एकहाती सत्ता स्थापन करता आलेली नाही.
आणखी वाचा : Chhattisgarh Elections 2025 : सत्तेच्या वादळात काँग्रेस भुईसपाट, भाजपाने जिंकल्या महापौरपदाच्या १० जागा
लालूंवर मेहुण्याचे गंभीर आरोप
या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र, त्याआधी आरजेडीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. लालू प्रसाद यादव यांचा मेहुणा व राबडी देवी यांचा भाऊ सुभाष यादव यांनी पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. १९९० ते २००५ या कालावधीत लालू यादव यांनी अपहरण प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून गुन्हेगारांना वाचवले, असं सुभाष यादव यांनी म्हटलं आहे. आरजेडीचे माजी राज्यसभा खासदार सुभाष यादव हे बऱ्याच काळापासून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबापासून दुरावले गेले आहेत. त्यांचे बंधू साधू यादव ऊर्फ अनिरुद्ध प्रसाद हेदेखील आरजेडीच्या राजवटील गैरकृत्यांच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मेहुण्यांबरोबरचे राजकीय संबंध तोडले आहेत.
“मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून व्हायची बोलणी”
काही काळ राजकारणातून दूर राहिल्यानंतर सुभाष यादव यांनी अलीकडेच लालू-राबडी देवी यांच्या राजवटीतील अराजकतेबद्दल वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “बिहारमधील अपहरणाचे खटले मुख्यमंत्री निवासस्थानातूनच हाताळले जात होते. मात्र, विरोधी पक्षाचे नेते अनेकदा अपहरणात सौदेबाजी केल्याच्या आरोपाखाली मला दोषी ठरवीत असत. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून संशयितांना फोन गेल्यानंतर पुढील बोलणी व्हायची”, असा आरोप यादव यांनी केला.
लालूंच्या मुलीच्या लग्नात काय घडले?
लालूंवर वैयक्तिक टीका करताना सुभाष म्हणाले, “जर मी अपहरणामागे असतो, तर मला तुरुंगात टाकले असते, जसे लालूजी चारा घोटाळ्यात दोषी ठरले होते.” सुभाष यांनी आरोप केला की, लालूंची मुलगी रोहिणी हिच्या लग्नासाठी पाटणा येथील शोरूम चालकांकडून जबरदस्तीने नवीन गाड्या घेण्यात आल्या, त्यांना एक रुपयाही देण्यात आला नाही. २०१० मध्ये लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतरच सुभाष व लालूंचे राजकीय संबंध बिघडले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले.
तेजस्वी यादव आरजेडीला पुन्हा सत्तेत आणणार?
सध्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे नेते पक्षाची खराब झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेजस्वी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करीत तरुण मतदारांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. मनमिळाऊ वृत्ती आणि ओघवत्या भाषणाच्या शैलीमुळे बिहारमध्ये तेजस्वी यांना काही वर्षांतच मोठी लोकप्रियता मिळाली आहे. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी आक्रमक प्रचार केला होता. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने १२५ जागांवर विजय मिळवला; तर महायुतीला ११० जागा जिंकता आल्या. तेजस्वी यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या आणि ७४ जागांसह भाजपा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने ४३ जागा जिंकल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली.
पंतप्रधान मोदी २५ फेब्रुवारीला करणार बिहार दौरा
दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवून आम आदमी पार्टीला सत्तेबाहेर करणाऱ्या भाजपानं आता बिहारकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार असून भागलपूरला भेट देणार आहेत. सुभाष यादव यांनी केलेल्या आरोपांचा फायदा घेऊन राष्ट्रीय जनता दलावर मोदी टीका करू शकतात, अशी भीती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. दरम्यान, सुभाष यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएचाच विजय होणार, अशी भविष्यवाणी केली आहे. जर पक्षांतरविरोधी कायदा नसता, तर आरजेडीचे अनेक आमदार फुटले असते, असा दावाही त्यांनी केला आहे. लालूंचे उत्तराधिकारी असलेल्या तेजस्वी यादव यांचे वर्णन त्यांनी हंगामी राजकारणी, असं केलं आहे.
“लालूंनी मानहानीचा दावा ठोकावा”
दरम्यान, सुभाष यादव यांच्या आरोपांनंतर जेडीयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. “सुभाष यादव यांनी लालू प्रसाद यांच्यावर थेट आरोप केले आहेत. जर लालू प्रसाद यांनी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल केला नाही, तर हे सिद्ध होईल की सुभाष यादव सत्य बोलत आहेत”, असं नीरज कुमार यांनी म्हटलं आहे. भाजपाचे नेते व बिहारचे कामगारमंत्री संतोष कुमार सिंह यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. ते म्हणाले, “आरजेडीच्या राजवटीत माझ्या स्वतःच्या मुलाचं अपहरण झालं होतं. मी ते कधीही विसरू शकत नाही. मुलाच्या सुटकेसाठी मला अनेक नेत्यांचे पाय धरावे लागले होते.”
आरजेडीकडून आरोपांचं खंडन
आरजेडीचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी सुभाष यादव यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. ते म्हणाले, “सुभाष यादव यांच्या आरोपांमागे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) नेत्यांचा हात आहे. लालू प्रसाद यांनी एनडीएला बिहारमध्ये पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असा निश्चय केल्यापासून सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांना सुभाष यादव यांच्या निराधार आरोपांमागे पाहतो.” दरम्यान, सुभाष यादव आणि राबडी देवी यांचे मोठे बंधू साधू यादव हेदेखील आरजेडीच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी सुभाष यांच्या आरोपांचं खंडन करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. अपहरणांची प्रकरणे सोडवण्यात सुभाष स्वतः सहभागी होते, असं साधू यादव यांनी म्हटलं आहे.
सुभाष यादव यांच्या आरोपांनी बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून सुभाष आणि साधू या दोन्ही भावांचे संबंध दुरावलेले आहेत. एकेकाळी साधू हे राबडी देवी यांच्या जवळचे मानले जात होते आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय म्हणून सुभाष यादव यांची ओळख होती.
आरजेडीच्या राजवटीत बिहारमध्ये गुन्हेगारीत वाढ
१९९० ते १९९५ या काळात आरजेडीच्या राजवटीत बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. गुन्हेगारी, खंडणी, अपहरणांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली होती. आकडेवारीनुसार, १९९४ ते २००० या कालावधीत बिहारमध्ये ३३७ खून झाले, ज्यातील ५० माओवाद्यांनी केले होते. तर, २००१ ते २००४ दरम्यान बिहारमध्ये एक हजार ५२७ अपहरणांची नोंद झाली, त्यापैकी ४११ घटना या २००४ मध्येच घडल्या. २००२ मध्ये पाटणा शहरात तीन प्रमुख डॉक्टरांचे एकामागोमाग एक अपहरण झाले होते. ऑर्थोपेडिक डॉ. भरत सिंग यांच्या अपहरणामुळे नागरिक रस्त्यावर उतरले होते. अखेर एका आठवड्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली.
हेही वाचा : Gujarat Election 2025 : गुजरातमध्ये भाजपाचाच दरारा, निवडणूक न लढताच इतक्या जागांवर विजयी
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या छायाचित्रकाराचे अपहरण
आणखी एक बहुचर्चित प्रकरण म्हणजे ‘हिंदुस्तान टाइम्स’चे छायाचित्रकार अशोक कर्ण यांचे २००२ मध्ये अपहरण झाले होते. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी या प्रकरणावर भाष्य केलं होतं. अशोक कर्ण यांची दोन तासांत सुटका होईल, असं लालू म्हणाले आणि खरोखरच त्याच संध्याकाळी छायाचित्रकाराला अपहरणकर्त्यांनी सोडून दिलं. २००३ मध्ये तत्कालीन कारागृहमंत्री राघवेंद्र प्रताप सिंह यांच्या नातेवाइकांचे अपहरण झाले. तत्कालीन डीजीपी डीपी ओझा यांनी सांगितले होते की, मुलाला सोडण्यापूर्वी मंत्र्यांच्या कुटुंबालाही ३० लाख रुपयां खंडणी द्यावी लागली.
उच्च न्यायालयाने वापरला होता ‘जंगलराज’ शब्द
२००५ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आरजेडीला सत्तेतून बाहेर केलं. त्यानंतर एका वर्षात बिहारमध्ये अपहरणांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. २००६ मध्ये बिहारमधील अपहरणाच्या घटनांची संख्या १९४ वर आली. २०१० मध्ये ही संख्या आणखी कमी होऊन ७२ वर आली. ऑगस्ट १९९७ मध्ये एका याचिकेवर सुनावणी करताना, पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ‘जंगलराज’ हा शब्द वापरला. तेव्हापासून हा शब्द लालू-राबडीदेवी राजवटीशी जोडला गेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तो पुन्हा समोर येत आहे.