Atishi Leaves Empty chair for Kejriwal: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. पण, यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर न बसता बाजूलाच दुसरी खुर्ची ठेवून बसणे पसंत केले. या घटनेची माहिती देताना त्या म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांना आपण प्रभू रामासमान मानतो. पुढचे चार महिने मी या खुर्चीच्या बाजूला बसून दिल्लीचा कारभार चालविणार आहे. ज्याप्रकारे रामायणामध्ये राजा भरत यांनी प्रभू रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याचा गाडा चालविला होता, त्याप्रमाणेच मीही करणार असल्याचे त्या म्हणाल्या. आम आदमी पक्षाने रामायणावर भाष्य करत प्रभू रामाची तुलना पक्षातील नेत्याशी केल्यानंतर आता यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतिशी मार्लेना काय म्हणाल्या?

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. पण, यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर न बसता बाजूलाच दुसरी खुर्ची ठेवून बसणे पसंत केले. या घटनेची माहिती देताना त्या म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांना आपण प्रभू रामासमान मानतो. पुढचे चार महिने मी या खुर्चीच्या बाजूला बसून दिल्लीचा कारभार चालविणार आहे. ज्याप्रकारे रामायणामध्ये राजा भरत यांनी प्रभू रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याचा गाडा चालविला होता, त्याप्रमाणेच मीही करणार असल्याचे त्या म्हणाल्या. आम आदमी पक्षाने रामायणावर भाष्य करत प्रभू रामाची तुलना पक्षातील नेत्याशी केल्यानंतर आता यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधीच आम आदमी पक्षाने रामायणाचे संदर्भ वापरून प्रचारास सुरुवात केली आहे. दिल्ली सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला अर्थसंकल्प सादर करत असताना हा राम राज्याचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले होते. २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर ‘आप’ पक्ष आणि आमदार दर मंगळवारी दिल्लीमधील मंदिरामध्ये ‘सुंदरकांड’ आणि ‘हनुमान चालिसा’चे पठण करत आहेत.

मलाही माता सीतेसारखी अग्नीपरीक्षा द्यावी लागेल – केजरीवाल

एवढेच नाही तर त्याआधी जेव्हा त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली, तेव्हादेखील त्यांच्या या त्यागाला त्यांनी सीता मातेच्या अग्निपरीक्षेची उपमा दिली होती. “त्यांनी माझ्यावर आरोप लावले. जेव्हा भगवान राम वनवासावरून परतले होते, तेव्हा सीता मातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती; आज मीही अग्निपरीक्षा द्यायला जात आहे”, असे विधान अरविंद केजरीवाल यांनी केले होते. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जामीन मिळाल्यानंतर रविवारी (२२ सप्टेंबर) दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर ‘आप’कडून ‘जनता की अदालत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अरविंद केजरीवाल यांनी हे विधान केले होते.

मी केजरीवाल यांचा लक्ष्मण – सिसोदिया

‘जनता की अदालत’, या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वतःला लक्ष्मणाची उपमा दिली. भाजपाने मला तुरुंगात त्रास देण्याचा प्रयत्न केला, केजरीवाल यांच्यापासून वेगळे होण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला, असाही आरोप सिसोदिया यांनी केला. “मला पक्षापासून तोडण्यासाठी खूप प्रयत्न झाले. मी केजरीवाल यांच्याबरोबरचे २६ वर्षांचे मैत्रीचे संबंध तोडणार नाही, हे कळाल्यानंतर भाजपाने मला १८ महिने तुरुंगात कोंडले. ज्याप्रकारे भगवान रामाने हुकूमशाह रावणाच्या विरोधात लढा दिला, त्याप्रकारचा लढा अरविंद केजरीवालही देतील आणि मी लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्या मार्गावर चालेन. जगातील कोणतीही शक्ती मला त्यांच्यापासून तोडू शकणार नाही”, असे भाषण मनीष सिसोदिया यांनी जंतर मंतरवर केले.

राम राज्याचा अर्थसंकल्प – आतिशी

यावर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री आतिशी यांनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात प्रभू राम किंवा राम राज्य असा जवळपास ४० वेळा उल्लेख केला. अर्थसंकल्प २०२४-२५ ची सोशल मीडियावर जाहिरात करत असताना आम आदमी पक्षाने ‘केजरीवाल का राम राज्य’ असा हॅशटॅगही चालविला होता.

२०२२ च्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या काही महिने आधी २०२१ च्या दिवाळीला आम आदमी पक्षाने त्यागराज मैदानात अयोध्येतील राम मंदिराची ३० फुटांची प्रतिकृती उभारली होती. तसेच पक्षाने २०२० च्या निवडणुकीआधी आपल्या तीर्थयात्रेच्या यादीत अयोध्याचाही समावेश केला होता. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ८७ हजार लोकांनी मोफत तीर्थयात्रेचा लाभ घेतला आहे.

भाजपाकडील मते खेचण्याचा आमचा प्रयत्न

या रणनीतीबाबत बोलताना ‘आप’च्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या माध्यमातून आम्ही मध्यम वर्गीय तसेच हिंदू संस्कृती आणि श्रद्धांवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे मत आमच्या बाजूने वळवू इच्छितो. हा मतदार धर्माच्या आधारावर भाजपाकडे वळला आहे, पण तो भाजपाचा मूळ मतदार नाही. आणखी एका नेत्याने सांगितले की, आम आदमी पक्षाने रामायणाचा याआधीही प्रचारात वापर केला होता. दिल्लीमध्ये पक्षाचा पाया भक्कम आहे. तसेच रामायणाच्या माध्यमातून आम्ही लोकांशी आणखी चांगल्या पद्धतीने जोडले जात आहोत.

दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की, धर्म आणि संस्कृतीबद्दल अनेक लोक भावनिक असतात. त्यामुळे या प्रकारच्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही आमची मतपेटी आणखी बळकट करत आहोत. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा का दिला? त्यांना अग्निपरीक्षा का द्यावी लागत आहे? हे लोकांना समजावून सांगण्याचा हा चांगला मार्ग आहे. भाषणातून जड शब्द वापरून सांगण्यापेक्षा रामायणाचा आधार घेऊन सांगितलेले लोकांना अधिक आश्वासक वाटते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atishi leaves empty chair for kejriwal is aap using ramayana for delhi assembly elections kvg
Show comments