भाजपातेर पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक आजपासून (३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर) मुंबई येथे होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे प्रतिनिधी आलोक देशपांडे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पटोले यांनी, बैठकीची पूर्वतयारी, राज्यातील महाविकास आघाडीचे भविष्य व इंडिया आघाडीत फूट पाडण्याच्या प्रयत्नांबाबत भाष्य केले. या मुलाखतीचा भाग प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात खालीलप्रमाणे …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाच्या मुख्यालयात राहुल गांधी यांचा सत्कार करण्याचे नियोजन तुम्ही केले आहे?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला भेट देणाऱ्या योद्ध्याचा सत्कार आम्हाला करायचा आहे. जे हुकूमशाही वृत्तीचे लोक देशाचे संविधान बदलण्याचा आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्याविरोधात लढण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या लढाईमुळे त्यांची खासदारकी मध्यंतरी रद्द करण्यात आली होती, तसेच त्यांना शासकीय निवासस्थानातूनही बाहेर काढण्यात आले.

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली, तेव्हा लोकसभा सभागृहात त्यांनी मणिपूरमधील आमच्या भगिनींबद्दल आवाज उचलला. जेव्हा असा योद्धा मुंबईत येऊन पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार आहे, अशा वेळी त्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेल्या राहुल गांधींमुळे महाराष्ट्र काँग्रेसला लाभ होईल?

राहुल गांधी यांच्या या भेटीचा फायदा घेऊन आम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अर्ध्याहून अधिक जनतेला पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा संकटकाळात राज्यातील आणि केंद्रातील सरकार राजकारण खेळण्यात व्यग्र आहे. गॅस सिलिंडरचे दर ७०० रुपयांनी वाढवून, मग त्यात २०० रुपयांची कपात करणे ही शुद्ध फसवणूक आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने हे प्रश्न उपस्थित करणार आहोत.

‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय का?

हो, असा प्रयत्न नक्कीच होत आहे. बंगळुरू येथे इंडिया आघाडीची बैठक होत असताना एनडीए (National Democratic Alliance) युतीने ३८ पक्षांची बैठक घेतली. आमच्याकडे जास्तीत जास्त राज्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि ही संख्या वाढत चालली आहे. साहजिकच इंडिया आघाडीची एनडीला भीती वाटत आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जागावाटपावरून गोंधळ आहे. अशा पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकेल?

महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा नेते) यांनी सांगितले आहे की, ज्या पक्षाची जिथे जास्त ताकद आहे, त्याप्रमाणे जागावाटप होईल. नरेंद्र मोदी सरकारला पराभूत करणे, हेच आमच्या आघाडीचे प्रमुख ध्येय आहे.

‘भारत राष्ट्र समिती’सारखा पक्ष भाजपाच्या इशाऱ्यावर काम करतोय, असे तुम्हाला वाटते का?

जरी त्यांनी असा प्रयत्न केला तरी त्याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. बीआरएसला त्यांच्याच राज्यात संघर्ष करावा लागत आहे आणि महाराष्ट्रातील जनता बाहेरच्या राज्यातील पक्षाला इथे तग धरू देणार नाही.

वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आघाडीत येणार का?

सध्या तरी त्यांच्या बाजूने आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही याबाबत त्यांच्याशी चर्चा केलेली नाही.