अकोला : जिल्ह्यात विविध प्रश्नांवरून भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडीकडून सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वंचित आघाडीने जनसमस्यांवरून आंदोलने छेडली. या आंदाेलनांमधून वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रश्नांवरून वंचित आघाडी वातावरण निर्मिती करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर खासदारदेखील भाजपचे आहेत. वर्षानुवर्षे भाजपच्याच जागा निवडून येत असल्याने अकोला जिल्हा भाजपचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागाची नाळ जुळलेली अकोला जिल्हा परिषद वंचित आघाडीचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या भाजप आणि वंचित आघाडीतच निवडणुकांमध्ये प्रामुख्याने लढत होते. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली. संघटन मजबूत करण्यासोबतच जनसामान्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न पक्षांकडून सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीने भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. विविध आंदोलने छेडून वंचित युवा आघाडीने लक्ष्य वेधून घेतले.
हेही वाचा – भाजपच्या ओबीसी अपमान प्रचाराच्या मुकाबल्यासाठी काँग्रेसही मैदानात
गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पूलावरून सर्वप्रथम वंचित आघाडी व भाजपमध्ये जुंपली. पुलाच्या प्रश्नावरून वंचित युवा आघाडीने अभिनव आंदोलन करून भाजपचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. वंचितच्या आंदोलनाला भाजपकडूनदेखील प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. वंचितने अधिक आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवली. शहरातील अपूर्ण गोरक्षण मार्गाच्या प्रश्नावरून आगळे-वेगळे आंदोलन केले. त्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडीने आपला मोर्चा मूर्तिजापूर मतदारसंघाकडे वळवला. भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्यावर अकार्यक्षमतेचा आरोप केला. अपघातप्रवण स्थळाला आमदार पिंपळे यांचे नाव दिले. वंचित युवा आघाडीच्या या आंदोलनांची चांगलीच चर्चा झाली.
अकोला शहरातील नागरिकांच्या अनेक मुलभूत समस्या आहेत. महापालिकेच्या करवसुलीमुळे नागरिक त्रस्त आहेत. जनसामन्यांचे हे प्रश्न लक्षात घेऊन वंचित आघाडीने महापालिकेवरदेखील धडक मोर्चा काढला. अकोला महापालिकेवर गत साडेसात वर्षांपासून भाजपची सत्ता होती. सध्या महापालिकेवर प्रशासक आहेत. महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे वंचित आघाडीने मोर्चाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नात हात घालत सत्ता भोगलेल्या भाजपवर निष्क्रियतेचा आरोप केला. एकूणच आंदोलनांच्या माध्यमातून वंचित आघाडीने निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची रंगीत तालीम
बाळापूर मतदारसंघातील प्रश्नांकडे डोळेझाक
वंचित बहुजन युवा आघाडीने भाजपचे आमदार असलेले अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रश्न व समस्यांवरून आंदोलने छेडली. आगळ्या-वेगळ्या आंदोलनांमधून लक्ष वेधून घेतले. मात्र, वंचित आघाडीने बाळापूर मतदारसंधातील प्रश्नांकडे डोळेझाक केल्याचे दिसते. वंचित आघाडी व उद्धव ठाकरे गटामध्ये युती झाली. बाळापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख प्रतिनिधित्व करतात. परिणामी, वंचित आघाडीने बाळापूर मतदारसंघाच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेत तेथील प्रश्न, समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे बोलल्या जात आहे.