सुहास सरदेशमुख
औरंगाबाद हे राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे नवा केंद्रबिंदू होऊ लागले आहे. वैराग्याचा-त्यागाचा भगवा आणि संपन्नतेचा हिरवा या रंगांमधील भेद धर्माच्या अंगाने इथे शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात विशेषत: मराठा मोर्चानंतर ध्रुवीकरणाला मराठा व मराठेतर अशी मिळालेली किनार अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत पोहचली आणि त्यातून दोन दशकांपासून शिवसेनेकडे असलेली औरंगाबाद लोकसभेची जागा गमावण्याची वेळ आली. त्यानंतर जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाचे मिश्रण अधिक मुरत गेले. आता येथील राजकारण वेगळ्या वाटेने नेण्याचा भाजप-मनसेचा प्रयत्न आहे. तर शिवसेनेला या ध्रुवीकरणात राजकीय प्रभाव टिकवण्याची कसरत करावी लागणार आहे. ध्रुवीकरणाचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की, इथे सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न मागे पडल्यासारखीच स्थिती आहे. दुसरीकडे भोंगे प्रकरणानंतर त्याचे उमटणारे पडसाद तसे कमी दिसले तरी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृतीची मालिका सुरू झालीच आहे. अकबरोद्दीन आवेसी यांच्यासह एमआयएमचे नेते नुकतेच औरंजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होऊन गेले. ही राजकीय छेड काढण्याची वृत्ती औरंगाबादच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरते आहे.
काय घडले-बिघडले?
पाठिंबा मतांमध्ये रुपांतरीत करणाऱ्या मानसिकतेला खतपाणी घातले की त्याचे संदेश फक्त मराठवाडाच नाही तर उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जात असल्याने औरंगाबाद जिल्हा महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा ठरतो आहे. राज ठाकरे, शरद पवार आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रस्तावित सभाही औरंगाबाद येथे जून मध्ये होणार आहे. ध्रुवीकरणाच्या खेळाचा वेग वाढतो आहे. यावेळीही या खेळात बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी आणि ॲड्. प्रकाश आंबेडकरही स्वतंत्रपणे सहभागी होतील. औरंगाबाद शहरातून संदेश दिला की तो राज्यभर पोहोचतो. प्रश्न वरवर सामाजिक वाटत असले तरी त्याचे अंतिम रुप राजकीय मतपरिवर्तनासाठी वापरले जाते, हे औरंगाबादकरही जाणून असतात. राज्यातील पहिला मराठा समाजाचा मोर्चा, त्यातील मागण्यांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेली संघटित शक्ती लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पाठिशी उभी राहिली. त्याच्या परिणामी संघटित झालेला ओबीसी वर्ग शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यामागे उभा राहिला. पण मराठा व मराठेतर वादात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे एमआयएमचे उमेदवार इत्मियाज जलील यांना विजय मिळाला. तेव्हा एमआयएमला वंचित बहुजन आघाडीची साथ होती.
गेल्या लोकसभेतील हे गणित लक्षात ठेवून औरंगाबादमधील ध्रुवीकरणाचे खेळ राज्यभर आणि राज्याबाहेरही मांडता येतात, हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत आक्रमक होत भाजपने ‘एमआयएम’ पक्षातील नेत्यांना रझाकारांची उपमा देत राजकीय पट मांडला होता. हैदराबाद मुक्ती लढ्याशी असणारे संबंध आणि तेव्हाच्या अत्याचाराची आठवण अनेकांच्या मनात असल्याने व त्या चळवळीचे एक प्रमुख केंद्र औरंगाबाद असल्याने औरंगाबाद शहरात ‘गंगा- जमनी तहजीब’ असावी असे वाटणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच. त्यामुळे हिंदुत्वाच्या वळणाने जाणारी मतपेढी औरंगाबादमध्ये सहजपणे तयार होते. सुरुवातीला हा प्रयोग शिवसेनेकडून केला गेला. त्याला यशही मिळाले. त्यामुळेच गेली ३३ वर्षे औरंगाबाद शहरात शिवसेना अग्रेसर आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदला अशी अधून-मधून निर्माण केली जाणारी मागणी हा ध्रुवीकरणाचाच एक भाग. औरंगाबादमध्ये आपापल्या धर्म व जातीच्या भावना अधिक तीव्र करता येतात व त्यावर राजकारण सहज उभे राहते, हा अनुभव असल्याने महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी औरंगाबाद शहरात सध्या सभांचा धडका सुरू आहे. भोंगे वादासाठी झालेली निवडही त्याच कारणाने असल्याचे दिसून येत होते. अजानचा आवाज आता कमी झाला आहे. पण या वादाकडे लक्ष देऊ नका, अशी भूमिका एमआयएमकडूनही जाहीरपणे व्यक्त केली आहे.
एमआयएमचे नेते भाषणाच्या शेवटी वादाच्या मुद्दयावर बोलतात. राज ठाकरे यांच्या भाषणाला उत्तर देण्यासाठी अकबरोद्दीन ओवेसी यांची सभा घेण्यात आलेली नाही, असे सांगितले जाते. प्रस्तावित शाळा सुरू करण्याच्या मंचावर अकबरोद्दीन यांनी , ‘ज्यांना घरातून बाहेर काढले, ज्यांची काही लायकी नाही, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगितले.’ तेव्हा वापरली जाणारी भाषा ही एकगठ्ठा मते कायम रहावीत अशीच होती. औरंगजेबाच्या कबरी समोर नतमस्तक होण्याची एमआयएमच्या नेत्यांची कृती छेड काढण्याच्या वृत्तीतून ध्रुवीकरणाच्या खेळाला वेग देणारीच होती. ‘आमलगीर औरंगजेब’च्या शेजारी किंवा खुलताबादमध्ये मृत्यूनंतर ‘दो गज’ जमीन मिळावी अशी इच्छा असदोद्दीन आवेसी यांनी या पूर्वीच्या सभेत व्यक्त केली होती. आता कबरीचे दर्शनही राजकीय ध्रुवीकरणाच्या खेळाचाच भाग होती.
संभाव्य राजकीय परिणाम
मुप्टा या शिक्षक संघटनेच्या वार्षिक अधिवेशना दरम्यान जाहीर भाषणात शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रबोधनकार वाचा असा मारलेला सणसणीत टोला व त्याला राज ठाकरे यांनी दिलेले उत्तर या पार्श्वभूमीवर राजकारण जुन्या वळणावरुन जाणार असे स्पष्ट दिसत आहे. ४२-४३ अंश तापमानात तीन दिवसाला रात्री दोन वाजता येणारे कमी दाबाचे पाणी भरत औरंगाबाद की संभाजीनगर या प्रश्नावर पुन्हा ध्रुवीकरणाच्या खेळात जिल्हा सहभागी होण्याची शक्यता अधिक दिसू लागली आहे. नाईलाज म्हणून का असेना औरंगाबादकर त्यात सहभागी होतील. तसतसे त्याचे संदेश शेजारच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पोहोचतील. या टाेकदार ध्रुवीकरणाच्या खेळात जे पक्ष सहभागी होत नाहीत, त्यांची वाढ खुंटते. औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसचे १० नगरसेवक होते तर राष्ट्रवादीचे तीन. एक पक्ष अशक्त आणि दुसरा कुपोषित. त्यामुळे हिंदुत्वाच्या मतपेढीत शिवसेना- भाजप यांच्यात आता मनसेलाही शिरकाव करायचा आहे. नव्हे हिंदुत्वाच्या मतपेढीत आपल्यासोबत मनसेला घेऊन शिवसेनेला सत्तेच्या परिघाबाहेर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेला राजकीय कसब पणाला लावावे लागेल. महापालिकेतील सत्ता व औरंगाबादमधील प्रभाव टिकवण्यासाठी धार्मिक-जातीय अशा दोन्ही पातळ्यांवर सोशल इंजिनीअरिंग करावे लागणार हे नक्की.