छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पत्नीच्या नावे मद्य परवाना असल्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना ‘दारूवाला’ ठरवून त्यांच्या विरोधात प्रचार सुरू आहे. तर त्याचे स्पष्टीकरण देत संदीपान भुमरे यांनी पाणी योजनेचे काम मिळावे म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेची वाट लावली असल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही बाजूच्या स्थानिक प्रचार मुद्द्यांमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात प्रचार तंत्र ‘ दारु’ विरुद्ध ‘ पाणी’ असे रंगवले जात आहे. या शिवाय चंद्रकांत खैरे यांनी विकासकामांमध्ये दहा टक्के कमीशन घेतल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे.
‘विकासावर बोला. माझ्या व्यावसायावर कशाला बोलता. जो व्यवसाय आहे तो शपथपत्रात दिला आहे. त्याच्या प्रती झेराॅक्स करा आणि मतदारसंघात वाटा. पण् तुम्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आणलेला निधी १० टक्के कमीशन घेऊन वैजापूर तालुक्यात वाटला. ’ असा आरोप महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर ग्रामीण भागात प्रचार करताना केला. त्यांनी हा आरोप नाकारावा आम्ही ती माणसे उभी करून आरोप सिद्ध करुन दाखवू. असेही ते म्हणाले. एकदा चंद्रकांत खैरे आणि मला एका व्यासपीठावर आणाच मग बघू असे म्हणत संदीपान भुमरे यांनी वैजापूर तालुक्यात प्रचाराला सुरुवात केली.
हेही वाचा : निवडणूक तोंडावर, सपाने बदलले १० जागांवरील उमेदवार; कारण काय?
भुमरे म्हणाले, ‘कोणी म्हणत नऊ आहेत. कोणी दहा. पण एवढे सांगण्यापेक्षा माझ्या शपथपत्रात दिलेली माहिती वाचा. फार तर त्याच्या प्रती काढून त्या मतदारसंघात वाटा ना, नको कोण म्हणते आहे. मी काही सरकारचा महसूल बुडवला नाही,’ असे स्पष्टीकरण ते देत आहेत. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्षाची ते जाहीर चर्चा करू लागले आहेत. ‘ गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांना कोण पाडले ?, आता एका गाडीत बसून, एकमेकांना पेढे भरवून प्रचार करत आहेत. पण तेव्हा गद्दार कोण होते. आता आम्हाला कशाला गद्दार म्हणता’ अशा शब्दात त्यांनी खैरे आणि दानवे यांच्यावर टीका केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुमरे यांची प्रतिमा ‘ दारू विक्रेता’ अशी करत उद्धव ठाकरे गटांनी त्यांच्यावर टीका केली होती.
हेही वाचा : जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच
शहराच्या पाणी योजनेची वाट लावली
आपल्यापैकी अनेकजण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. त्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचे काम आपल्याला मिळावे म्हणून चंद्रकांत खैरे यांनी शहराची पूर्णत: वाट लावली असल्याचा आरोपही भुमरे यांनी केला. या नव्या प्रचारतंत्रामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रचार दारू विरुद्ध पाणी असा होऊ लागला आहे.