सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या किरण पाटील यांना १४ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आणि आठ दिवसानंतर त्यांना औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडे उमेवार नव्हतेच. त्यामुळे किरण पाटील या काँग्रेसमध्ये तसेच औरंगाबादच्या हडको- सिडको समितीवर काम करणाऱ्या व्यक्तीस भाजपने उमदेवारी जाहीर केली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून ही निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे कोण हे किरण पाटील याची माहिती आता भाजप आणि ‘संघ परिवारा’तूनही विचारली जात आहे.

शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने कधीच उमेदवार उभे केले नाहीत. वारंवार विनंती करूनही काँग्रेस नेते शिक्षक मतदारसंघात उमेदवार उभा करण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे किरण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. बीड, औरंगाबाद जिल्ह्यात तिरुपती शिक्षण संस्थेचे चालक म्हणून काम करणारे किरण पाटीेल उमेदवारीविषयी बोलताना म्हणाले, काँग्रेसमध्ये असतानाही आम्ही खूप काम करायचो. पण त्याचा उपयोगच होत नव्हता. सतत राष्ट्रवादीलाच उमेदवारी मिळणार असल्याने पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नव्हता. भाजपचे विचार आणि कार्यशैलीमुळेही प्रभावित असल्याने या पक्षात प्रवेश घेतला. आता उमेदवारीही देण्यात आल्याने शिक्षक मतदारसंघात लढा देऊ.’ या पूर्वी शिक्षक मतदारसंघात भाजपाला एकदाही यश मिळाले नव्हते. त्यामुळे या वेळी नवा प्रयोग केला जाईल अशी शक्यता होती.

हेही वाचा : सोनियांचे निष्ठावान शिवराज पाटील यांना काँग्रेसनेच फटकारले

मात्र, थेट काँग्रेसमधून आयात केलेल्या व्यक्तीला आता उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला आहे. किरण पाटील हे वसंतदादा कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करतात तसेच त्यांच्या शैक्षणिक संस्था असल्याने त्यांचा चांगला संपर्क असल्याचा दावा भाजपकडून केला आहे. पाटील यांनी राज्य माध्यमिक शिक्षक मंडळावर सदस्य म्हणून काम केले आहे. काँग्रेस शहर चिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार विक्रम काळे यांनी सलग दोन वेळा निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात असणाऱ्या या मतदारसंघात कोणत्या भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी अलिकडेच भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविषयी एक वादग्रस्त विधान केले. शिक्षक मतदारसंघाची आवश्यकताच नाही, असेही ते म्हणाले. हे त्यांचे मत वैयक्तिक असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. पण या मतदारसंघात नाराजीचा सूर अधिक असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले होते. या मतदारसंघात भाजपातून कोणी उमेदवार इच्छुक नसल्याने काँग्रेसमधूश आलेल्या व्यक्तीस भाजपने उमदेवारी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad teachers constituency bjp import candidate congress kiran patil bawankule rss print politics news tmb 01
Show comments