“परकीय आक्रमकाचा वंशज असलेल्या औरंगजेबाने हिंदूंवर अत्याचाराचा कळस केला होता. जिहादी मानसिकतेच्या औरंगजेबाच्या कबरीचे या राज्यात अस्तित्व असू नये, राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी ती कबर हटवावी, अन्यथा प्रत्यक्ष ‘कारसेवा’ कृती करून ती कबर तिथून नष्ट करू”, असा इशारा बजरंग दलाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानंतर बंजरंग दलाने, विश्व हिंदू परिषदेने ठिकठिकाणी आंदोलने केली. तसेच नागपुरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे जवळपास ३० ते ३५ कार्यकर्ते सोमवारी (१७ मार्च) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महाल झेंडा चौकात मुघल बादशाह औरंगजेबाचे छायाचित्र घेऊन दाखल झाले. त्याचबरोबर त्यांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तयार केली होती. या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. पाठोपाठ औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरीवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी चादर टाकण्यात आल्याचा आणि त्यावर धर्मग्रंथातील काही ओळी लिहिल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर ती चादर पेटवल्याची अफवा पसरली आणि रात्री नागपुरात दंगल उसळली.

तणाव कशामुळे निर्माण झाला?

औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर नागपुरात दोन गटांत संघर्ष पेटला. यात दोन्ही गटातील युवकांनी एकमेकावर दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्या अधिक भागात संचारबंदी जाहीर केली. तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी १५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

“कबरीतला औरंगजेब बाहेर काढून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न होतोय”, संजय राऊतांचा सरकारवर संताप

दरम्यान, कबरीतला औरंगजेब बाहेर काढून राज्यात दंगली पेटवल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. पाठोपाठ विहिंप, बजरंग दल व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेब प्रकरणावरून सर्वांचे कान टोचले आहेत.

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा संयुक्तिक नाही : आरएसएस

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, दंगल पेटलेली असताना संघाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळूरूमध्ये होणार असून या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी वार्ताहरांनी त्यांना नागपूरची दंगल व औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेल्या वादळावरून प्रश्न विचारले. त्यावर आंबेकर म्हणाले, औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

सुनील आंबेकर काय म्हणाले?

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवर संघाची भूमिका काय आहे? असा प्रश्न पत्रकार परिषदेवेळी सुनील आंबेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आंबेकर म्हणाले, “संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही.” त्यावर देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना आता औरंगजेबाचा प्रश्न निर्माण करून आंदोलन करणे योग्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आंबेकर यांना आला. त्यावर आंबेकर यांनी औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असं उत्तर दिलं.

संघाने या प्रकरणापसून स्वतःला दूर ठेवल्यानंतर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी देखील यावर भाष्य केलं. ते म्हणाले, सुनील आंबेकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी इतका मी मोठा नाही. नागपुरात घडलेली घटना सुनीयोजित कटाचा भाग आहे आणि मी या भूमिकेवर ठाम आहे.

अशा विषयांवरून समाजात दोन गट पडणे योग्य नाही : मुनगंटीवार

दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील संघाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “औरंग्याचं उदात्तीकरण होता कामा नये. या अशा विषयावरून समाजात तेढ निर्माण होऊ नये ही संघाची ठाम भूमिका आहे. या विषयावरून समाजात दोन गट निर्माण होणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. त्यांच्या विचारांवर, पराक्रमी इतिहासावर आपण श्रद्धा ठेवावी.” मुनगंटीवार एबीपी माझाशी बातचीत करत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले की औरंगजेबाचा मुद्दा संयुक्तिक नव्हता तर विश्व हिंदू परिषदेने, बजरंग दलाने हा मुद्दा हाती का घेतला? मंत्री नितेश राणे यांनी कबर हटवण्याची मागणी का केली? त्यावर मुनगंटीवार म्हणाले, “ती केवळ क्रियेवरील प्रतिक्रिया होती.”

…तर हा मुद्दा पुढे आला नसता : मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “एका आमदाराने औरंग्याचं उदात्तीकरण केलं. त्यावर विहिंप, बजरंग दलाची ती प्रतिक्रिया होती. अबू आझमी यांनी उदत्तीकरण केलं नसतं तर हा मुद्दाच पुढे आला नसता. अबू आझमी म्हणाले की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता वगैरे, त्यानंतर लोकांचा संताप समोर आला. अलीकडेच छावा चित्रपट सर्वांनी पाहिला. त्या चित्रपटाद्वारे औरंग्याचा क्रूर चेहरा लोकांच्या समोर आला. त्यामुळे औरंगजेबाबद्दलचा राग उफाळून आला. त्याचा सैतानी चेहरा समोर येईल असं चित्रण त्या चित्रपटात आहे. त्यामुळे लोकांमध्ये क्षोभ निर्माण झाला.”

आमची मान शरमेने खाली गेली : काँग्रेस

दरम्यान, यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आपल्या राज्यासमोर, देशासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. देशातील १०० कोटी लोक दिवसाला १०० रुपये कमावू शकत नाहीत, असा अहवाल रिझर्व्ह बँकेनेच सादर केला आहे. देशात रोजगार निर्मिती होत नाहीये. अशा स्थितीत देश आंदोलनांमध्ये झोकला गेला, दंगलींमध्ये अडकला तर हे या देशासाठी चांगलं नाही. नागपुरात जे काही घडलं ते पाहून एक नागपूरकर म्हणून माझी मान शरमेने खाली गेली आहे. सर्वच नागपूरकरांची मान शरमेने झुकली आहे. मिळून मिसळून राहणारे हिंदू-मुस्लीम या गोष्टीमुळे एकमेकांसमोर उभे ठाकले हे पाहून आम्हाला लाज वाटतेय.