समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगजेबाबाबत विधान केल्याने महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे, त्यामुळे औरंगजेबाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आहे. औरंगजेबाच्या मंदिर बांधणीच्या प्रयत्नांवर आणि कारभारावर आझमी यांनी केलेल्या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांचा अनादर केल्याचा आरोप केला. आझमी यांनी केलेल्या विधानानंतर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही.

औरंगजेबाचा महाराष्ट्राशी संबंध काय?
औरंगजेब म्हणजेच मुही अल दीन मुहम्मद याने दख्खन प्रांतावर ४९ वर्ष राज्य केलं. सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील भागांमध्येच औरंगजेबाने आयुष्याचा शेवटचा काळ व्यतीत केला.

औरंगजेब आणि मराठा सैन्य यांच्यात झालेला प्रचंड संघर्ष त्या काळाचं व्यवच्छेदक लक्षण होतं. मराठ्यांनीच औरंगजेबाची सद्दी मोडून काढत स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राच्या वाटचालीतला हा मैलाचा दगड मानला जातो. मराठा साम्राज्याची घोडदौड आणि मुघल साम्राज्याला लागलेली घरघर या काळाने पाहिली. १६८९ मध्ये मुघलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांना पकडले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत मुघलांनी त्यांना प्रचंड छळले, त्यामुळे मराठ्यांच्या दृष्टीने औरंगजेब हा एक क्रूर शत्रू मानला जातो. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ या सिनेमात संभाजी महाराजांच्या मृत्यूचे चित्रीकरण दाखवले आहे. त्यावरून दडपशाही, धार्मिक असहिष्णुता आणि क्रूरतेचे प्रतीक म्हणून औरंगजेबाची प्रतिमा अधोरेखित झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणावर औरंगजेबाचा काय परिणाम

शिवाजी महाराजांवर महात्मा फुलेंनी लिहिलेल्या गीतांमध्ये औरंगजेबाचा उल्लेख हा मानवी रूपातील एक खरा राक्षस, ज्याने संपूर्ण हिंदू जगाला मुळापासून मिटवण्याची प्रतिज्ञा घेतली होती असा केला आहे. विनायक दामोदर सावरकरांनी त्यांच्या ‘द सिक्स इपोक्स ऑफ ग्लोरियस इंडियन हिस्ट्री’ या पुस्तकात औरंगजेब एक अतिशय निंदनीय व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले आहे.
उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू सांस्कृतिक पुनरुत्थान निमित्ताने स्वातंत्र्य मिळाल्यापासून औरंगजेबाने केलेल्या जुलूमाचा उल्लेख केला आहे. मात्र, १९६० आणि १९७० च्या दशकात औरंगजेबाचा मुद्दा मागेच पडला.

मराठा-मुघल लढाया ज्या ठिकाणी झाल्या असे किल्ले आणि वास्तू आजही महाराष्ट्रात आहेत. राजकीय पातळीवर शिवसेनेने पहिल्यांदा या सगळ्याला राजकीय परिप्रेक्ष्यात आणलं. शिवसेनेने औरंगाबादवर लक्ष केंद्रित केलं. औरंगजेबाच्या नावावरून या शहराला हे नाव मिळालं आहे. मुस्लिमबहुल असा या शहराचा पोत आहे.

राजकारणात शिवसेनेने प्रथम राजकीय हेतूसाठी मराठा-मुघल शत्रुत्वाचा वापर सर्वप्रथम केला. मुंबईबाहेर आपल्या पक्षाचा विस्तार करत असताना सेनेने औरंगजेबाच्या नावावर असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात मुस्लीम समुदाय असलेल्या औरंगाबाद शहरावर आपलं लक्ष केंद्रित केलं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम राजकारणात मराठा-मुघलांच्या शत्रुत्वाचा दाखला देत मुस्लिमांची औरंगजेबाशी तुलना केली. परिणामी, औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले.

“३०० वर्षांपासून औरंगजेबाचे भूत या देशाला पछाडत आहे… ३०० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि मर्द मराठ्यांनी औरंगजेबाला औरंगाबादच्या त्याच मातीत गाडला”, असे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये लिहिले होते. सर्वात आधी शिवसेनेने या शहराचं नाव बदलण्याची मागणी केली होती आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे ठेवण्याची घोषणा केली. १९९५ मध्ये, सेनेच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद पालिकेने शहराने नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, कायदेशीर आव्हानांमुळे हा निर्णय अमलात आला नव्हता. शिवसेनेच्या तत्कालीन राजकारणात औरंगजेब केंद्रस्थानी होता. बाळासाहेब ठाकरे त्याचा उल्लेख औरंग्या असा करायचे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने शब्दांच्या निवडीत थोडी सावधगिरी बाळगली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भाजपा महाराष्ट्रात औरंगजेबाचे मुख्य टीकाकार बनले.
२०२२ मध्ये शिवसेनेच्या हातून सत्ता गेली. त्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा हा त्यांचा शेवटचा निर्णय़ ठरला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या जागी भाजपाच्या पाठिंब्याने आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने मागील सर्व निर्णय़ रद्द करून शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले.

औरंगजेबावरून नेमके काय वाद आहेत?
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या छावा या सिनेमामार्फत औरंगजेबाच्या क्रूरपणावर पुन्हा प्रकाशझोत टाकला गेला. मे २०२२ मध्ये एआयएमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी खुलदाबाद इथल्या औरंगजेबाच्या थडग्याला भेट दिली, यावरून प्रचंड वाद निर्माण झाला.

२०२३ मध्ये काही अल्पवयीन मुस्लीम मुलांनी मुघल सम्राटाचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. या प्रकरणी त्या सर्व तरुणांना अटक करण्यात आली.
२०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंगजेब की औलाद’ अशी काही मुस्लीम नागरिकांवर टीका केली होती. कोल्हापुरात काही समाजकंटक नागरिकांनी प्रक्षोभक सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता, त्यामुळे काही काळ जातीय तणाव आणि हिंसाचार उफाळला होता. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी औरंगजेबाच्या प्रतिमेचा वापर केला जात असल्याचा आरोप यावेळी सत्ताधारी आघाडीने केला होता. “एका विशिष्ट समुदायातील काही लोक औरंगजेबाचा गौरव करतात, त्यामुळे दंगलीची परिस्थिती निर्माण झाली”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

औरंगजेब या विषयापासून दूर राहा असा सल्ला राज्यातील विविध पक्षीय मुस्लीम नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचा समावेश होता. हिंदुस्तानातील मुस्लीम बांधव औरंगजेबाशी वारसा सांगत नाहीत. एकता, बंधुता आणि सामाजिक विकासासाठी कटिबद्ध राहूया असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं होतं.

मुस्लीम नेते आपल्या कार्यकर्त्यांना औरंगजेब विषयापासून लांब राहा सांगत असताना वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी मात्र औरंगजेबाचा मुद्दा उचलून धरला. २०२३ मध्ये आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्पांजली अर्पण केली होती.

महाराष्ट्रात मुघलांना नेहमीच प्रखर संघर्षाला सामोरं जावं लागलं. गेल्या काही वर्षांत मात्र राजकारणात त्याचा समावेश झाल्यामुळे हा विरोध आणखी तीव्र झाला आहे. ‘छावा’ सिनेमा पाहिल्यावर लोकांच्या आलेल्या प्रतिसादावरून हे काही प्रमाणात स्पष्ट होते. यावरूनच अबू आझमी यांनी ‘छावा’मध्ये चुकीचा इतिहास दाखवला आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बांधली… मला वाटत नाही की तो क्रूर प्रशासक होता असे म्हटले होते”, असे आझमी यांनी म्हटले होते. दुसरीकडे, औरंगजेबाच्या मुद्द्यावर विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करत आझमी यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. या मुद्द्यावर राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं असताना औरंगजेबाचा मुद्दा पुढे आणत बीड प्रकरणावरून लक्ष हटवण्यात राज्य सरकारला मदतच झाली, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
अबू आझमींच्या वक्तव्यानंतर तसंच अलीकडच्याच काळात विविध वादांवरून औरंगजेबाची कबर पाडण्याचीही मागणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले भाजपाचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शुक्रवारी ही कबर पाडण्याची मागणी केली. शिवाय मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि इतर भाजपा नेत्यांनीही ही मागणी केली आहे.

Story img Loader