Aurangzeb : छावा नावाचा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं. त्यानंतरही बराच वाद निर्माण झाला. दरम्यान भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली होती. त्यानंतर मागच्या ९ दिवसांत काय घडलं जाणून घेऊ.
७ मार्चला उदयनराजे काय म्हणाले होते?
“औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे.” यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही वक्तव्य समोर आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले?
उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हालाही असंच वाटतं की कबर उखडून टाकावी. पण काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालं आहे.” गुरु तेग बहाद्दुर यांच्या ३५० व्या शहीद वर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान हा मुद्दा संसदेतही गाजला.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?
औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. तसंच हिंदू मंदिरंही पाडली. या मंदिरांमधली संपत्ती लुटली. तसंच शिखांच्या नवव्या आणि दहाव्या धर्मगुरुंची हत्या केली. याच औरंगजेबाची कबर पुरातत्व खात्याने खुलताबाद या ठिकाणी संरक्षित केली आहे. ही कबर संरक्षित करण्याची गरज काय? असा सवाल नरेश म्हस्केंनी केला आहे. तसंच औरंगजेबच नाही तर भारताविरोधात काम करणाऱ्या सगळ्यांचीच स्मारकं आणि कबरी नष्ट कराव्यात अशी मागणी केली आहे.
विश्व हिंदू परिषदेचा इशारा काय?
महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी केली आहे. तसंच औरंगजेबाची कबर न हटवल्यास कारसेवा करुन बाबरी प्रमाणे ती कबर हटवली जाईल असाही इशारा विहिंपने दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही कबर इथून हटवू नये अशी मागणी केली आहे. त्यांच्यावर पुन्हा एकदा नरेश म्हस्केंनी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड विरुद्ध नरेश म्हस्के
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपल्याकडे रोज औरंगजेब जिवंत होतो. कधी विधानसभेत, कधी कणकवलीत. सरकारच्या योजना काय? मल्हार सर्टिफिकेट, झटका-हलाल प्रमाणपत्र आणि धार्मिक घोषणा. आपलं सरकार औरंगजेब, भोंगे, हलाल-झटका यावर घाम गाळतं. माझा प्रश्न असा आहे महाराष्ट्राचा राज्यकारभार कोण चालवतो? राज्यकर्ते की धार्मिक एजंट? तसंच अफझल खानाला बाजूला करुन प्रतापगडाची लढाई सांगता येईल का? हिटलरला बाजूला करुन दुसरं महायुद्ध सांगता येईल का?” असेही प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. तर त्यांना उत्तर देताना नरेश म्हस्केंनी त्यांचा उल्लेख जितू मियाँ आव्हाड असा केला. नरेश म्हस्के म्हणाले, ज्यांना औरंगजेब यांची कबर ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब त्यांचा देव आहे हे मान्य करावं.
संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या विषयावर म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवर बोलताय, इथे तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता जळाल्या आहेत त्यावर बोला. त्यावर कुणालाही संवेदना नाहीत. तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेबाने कबरीतून उठून आत्महत्या करायला लावली का?बेरोजगार मुलांच्या डोक्यात धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जातं आहे. काश्मीरमधला तरुण दंगलखोर झाला कारण त्यांच्या हाताला काम नव्हतं. आज महाराष्ट्रातही मला काश्मीरसारखी परिस्थिती दिसते आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं
मागच्या नऊ दिवसांमध्ये या विविध प्रतिक्रिया औरंगजेब आणि त्याची कबर उखडण्याची मागणी झाल्यापासून उमटल्या आहेत. दरम्यान मंत्री नितेश राणेंनीही औरंगजेबाची कबर उखडावी असं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने याबाबत काय तो निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही औरंगजेबाच्या कबरीचा वाद, झटका, हलाल मटण या सगळ्या गोष्टी बंद करा. या ड्रामामध्ये कुणालाही इंटरेस्ट नाही असं म्हटलं आहे. राज्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. आता औरंगजेबाच्या कबरीचा हा वाद नेमका कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.