महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वादविवाद वादविवाद शमण्याची चिन्हं नाहीत. याच मुद्द्यावरून एका अफवेमुळे सोमवारी नागपुरात हिंसाचार झाला. या सर्व प्रकरणात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनिल आंबेकर यांनी बंगळुरू इथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत नागपूर हिंसाचाराविषयी भाष्य केलं आहे. २१ ते २३ मार्चदरम्यान या सभेचं आयोजन केलेलं आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या नागपूर हिंसाचाराचा संघाने निषेध केला आहे. तर मुघल सम्राट आता प्रासंगिक नाही असं विधान संघाचे सुनिल आंबेकर यांनी केलं आहे.

आरएसएसचं म्हणणं काय?

३०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला औरंगजेब आजच्या काळात प्रासंगिक होता का आणि त्याची कबर हटवली पाहिजे का असा प्रश्न आंबेकरांना विचारला असता “तो प्रासंगिक नाही”, असं उत्तर दिलं आहे.

“मला वाटते की कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाजासाठी चांगला नाही. पोलीस याची दखल घेतच आहेत आणि आम्हीही त्याचा तपशील जाणून घेऊ,” असं वक्तव्य त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत केलं आहे.
नागपूर शहरातील विविध भागांत सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी धार्मिक मजकूर असलेला कापड जाळल्याचा आरोप करत दगडफेक आणि जाळपोळ झाल्याने हा हिंसाचार फोफावला.

या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. आम्हाला दगडांनी भरलेली ट्रॉली आणि शस्त्रास्त्रे सापडली आहेत, जी आम्ही जप्त केली आहेत. हिंसाचार करणाऱ्यांनी निवडक घरं आणि संस्थांना लक्ष्य करण्यात आलं होतं.”

आरएसएसच्या बैठकीत भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच आणि वनवासी कल्याण आश्रम अशा इतर ३२ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. यावेळी बांग्लादेशाबाबत आणि आरएसएसच्या पुढील वाटचालीबाबत दोन ठराव मंजूर केले जातील अशी माहितीही आंबेकर यांनी दिली आहे.

“बांग्लादेशच्या ठरावात देशात काय घडत आहे आणि त्याबाबत काय केलं पाहिजे यावर चर्चा होईल. बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तर सर्वजण जागरूक आहेत. हिंदू जगात कुठेही असले तरी त्यांचा अभिमान आणि संवेदनशीलता याचा आदर झालाच पाहिजे अशी आमची इच्छा असल्याचे आंबेकर म्हणाले.

या बैठकीत दुसरा ठराव आरएसएसला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबाबत असेल. “हा एक मोठा प्रवास आहे. या ठरावात समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल आणि भविष्यात संघ कोणते कार्यक्रम हाती घेईल याची माहिती देण्यात येईल असं आंबेकर यांनी सांगितलं. या शताब्दी वर्षात संघ सामाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून संघाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवेल असेही ते म्हणाले. “संघाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व स्तरातील लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्नही केला जाईल असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी विशेषत: ‘पंच परिवर्तन’ या कार्यक्रमाचा उल्लेख केला ज्यामध्ये समानता आणि बंधुता वाढवणे, पर्यावरण अनुकूल जीवनशैली स्वीकारणे, कौटुंबिक मूल्यांचे पुनरूज्जीवन करणे, नागरी जबाबदारीला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.

“या कार्यक्रमात देशभरातील संघ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या प्रदेशातील स्थितीबाबत बोलण्याची संधीही मिळणार आहे. त्यांच्यासाठी प्रशिक्षण सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या वेबसाईट्सद्वारे संपर्क साधणाऱ्या तरूणांची संख्या आता १.२ लाखांहून अधिक आहे”, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी संघातर्फे पोर्तुगीजांशी लढणाऱ्या १६व्या शतकातील महिला शासक अब्बक्का चौटा यांना आदरांजली वाहण्यात येईल.