Aurangzeb Tomb : छावा चित्रपट झाल्यानंतर देशभरात त्याची चर्चा होऊ लागली. त्यापाठोपाठ चर्चा होऊ लागली ती औरंगजेबाची. एवढंच काय भाजपाचे खासदार उदयनराजे यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनीही याचप्रकारची मागणी केली आहे. त्यानंतर या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत आता भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्रात सध्या दोन वाद चर्चेत
महाराष्ट्रात सध्या दोन वाद चांगलेच चर्चेत आहेत. पहिला आहे तो औरंगजेबाच्या कबरीचा. छत्रपती संभाजीनगर जवळच्या खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावरुन सुरु झालेला वाद शमतो न शमतो तोच कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर रचलेल्या विडंबनात्मक गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने ज्या स्टुडिओत हे गाणं सादर केलं त्याची तोडफोड करण्यात आली तसंच कुणाल कामराच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले. या दोन्ही मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे आणि भूमिका मांडली आहे.
प्रश्न : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी महाराष्ट्रात होते आहे त्यावर तुमचं मत काय?
रामदास आठवले : औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये झाले आहे. मागच्या ३०० वर्षांमध्ये त्याची कबर उखडून टाकण्याचा मुद्दा कुठेही उपस्थित झाल्याचं ऐकिवात नाही. मात्र छावा सिनेमा आला, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर औरंगजेबाने कसे अनन्वित अत्याचार केले ते दाखवण्यात आलं. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार केलं हा इतिहास लोकांना माहीत होता. मात्र चित्रपट संपूर्ण भारतभरात प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर कशा प्रकारे अत्याचार झाले ते चित्रपटात दाखवण्यात आलं. जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होते आहे. मी एनडीएचा भाग आहे. मोदींना माझा पाठिंबा आहे. मात्र माझं मत हे आहे की औरंगजेबाची कबर हटवून काहीही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला माहीत आहे. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांच्याकडून स्वराज्याचा भाग जिंकण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या निधनानंतर तो महाराष्ट्रात तळ ठोकून राहिला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षे त्याच्याशी लढा दिला. जेव्हा त्यांना फितुरीने पकडलं गेलं तेव्हा त्यांनी धर्म सोडण्यास आणि औरंगजेबासमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हाल हाल करुन मारलं. त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली. त्यावेळी महार समाजातील गोविंद गायकवाड यांनी भीमा कोरेगाव जवळच्या गावात छत्रपती संभाजी महाराजांचा छिन्नविछिन्न देह पाहिला. त्या तो मृतदेह शिवला आणि मग त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकायचा होता. मात्र त्याला तो जिंकता आला नाही. मराठ्यांनी त्याला महाराष्ट्रात सळो की पळो करुन सोडलं होतं. त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे. जी उखडून काहीही होणार नाही. मात्र मुस्लिमांनी औरंगजेबाच्या कबरीपासून दूर राहिलं पाहिजे. तसंच हिंदूंनी ती कबर उखडण्याची मागणी करायला नको.
हिंदू मुस्लिम वाद होणं देशासाठी चांगलं नाही-आठवले
नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन दंगल पेटली होती. ज्यानंतर ASI ने म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलं आहे. मुंबईत १९९२ मध्ये जी दंगल उसळली होती त्यानंतर दंगल उसळली नाही. १९९२ नंतर काही मुस्लिम पाकिस्तानात गेले. त्यांनी तिथे ट्रेनिंग घेतलं आणि दहशतवादी झाले. काहींना पोलिसांनी पकडलं मात्र हिंदूंनी त्यावेळीही मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक केली नाही. त्यामुळे मुस्लिम लोक मुंबईत शांततेत राहू शकले. उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव यांची सत्ता होती तेव्हा दंगल झाली. योगी आदित्यनाथांच्या काळात असं काही घडलं नाही. असंही रामदास आठवलेंनी सांगितलं. मुस्लिम समाजाला मोदी सरकारच्या योजनांचाही लाभ मिळतो. ते मुस्लिम आहेत म्हणून कुठलाही भेदाभेद केला जातो नाही. हिंदू मुस्लिम वाद देशासाठी चांगला नाही असंही मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं.
प्रश्न : तुम्ही छावा चित्रपटाचा उल्लेख केलात आणि त्यामुळे औरंगजेबाची कबर उखडण्याचा मुद्दा पुढे आल्याचं म्हणालात. सिनेमा तयार करताना निर्माता दिग्दर्शकांनी अधिक काळजी घ्यायला हवी का?
रामदास आठवले : नक्कीच. सिनेमा निर्मात्यांनी अशा प्रकारचे संवेदनशील विषय हाताळताना काळजी घेतली पाहिजे. मात्र त्याचवेळी हेदेखील खरं आहे की इतिहासात जे घडलं ते वास्तवही दाखवलं पाहिजे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतात असंही दृश्य होतं ते वगळण्यात आलं. मात्र आता जे छावा चित्रपटात आहे तो इतिहास दाखवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे इतिहास दाखवला गेला पाहिजे.
प्रश्न : कुणाल कामरावरुन जो वाद निर्माण झालाय त्यावर तुमचं मत काय?
रामदास आठवले : कुणाल कामरा हा एक चांगला कॉमेडियन आहे. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. मात्र त्याने गद्दार वगैरे सारखे शब्द वापरणं चुकीचं आहे. कॉमेडी केली, विडंबन केलं हे ठीक आहे मात्र भाषा आणि शब्दांबाबत काळजी घेतली पाहिजे. त्याने जे गाणं म्हटलं ते म्हणायला नको होतं.