मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून राहण्यापेक्षा आपण शेतीच्या कामांसाठी चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी आलो असून पक्षश्रेष्ठींची गरज आणि आदेशानुसार केव्हाही उपलब्ध राहू, असे आमदार भास्कर जाधव यांनी काल (शुक्रवार) स्पष्ट केले.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर रात्री ठाकरे कुटुंबियांबरोबर असलेले आमदार दुसऱ्या दिवशी शिंदेंच्या गोटात सामील होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गुहागरचे आमदार जाधव यांनी आपला मुक्काम मुंबईतून हलवला आहे. बंधुवर झालेली शस्त्रक्रिया आणि शेतीच्या कामासाठी भास्कर जाधव चिपळूणात दाखल झाले. तेथून ते तुरंबव येथील आपल्या गावी निघून गेले. तेथे मोबाईलची रेंज नसल्यामुळे जाधवही गुव्हाटीला गेल्याची अफवा पसरली.

… त्यामुळे मी ‘नॉट रिचेबल’ होतो –

त्यामुळे प्रसारमाध्यमांपुढे वस्तुस्थिती कथन करताना ते म्हणाले की, “मी शेतकरी असल्यामुळे शेतीची कामे आणि कौटुंबिक कामांसाठी घरी आलो आहे. गावी मोबाईलची रेंज नसल्यामुळे फोन लागत नाही त्यामुळे मी ‘नॉट रिचेबल’ होतो. याचा अर्थ मी पक्ष सोडलेला नाही. माझी पक्षाला गरज लागेल त्यावेळी मी मुंबईत जाईन.”

… याचेही आत्मपरिक्षण शिवसेनेच्या आमदारांनी केले पाहिजे –

ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना कमी निधी मिळाला, ही तक्रार चुकीची असल्याचे नमूद करून आमदार जाधव म्हणाले की, “अर्थ खाते हे सर्वांनी मिळवून चालवण्याचे खाते आहे. अर्थमंत्री अजित पवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात बसलेले असायचे. त्यांनी आपल्या स्टाईलने काम केले असले, तरी अर्थ खात्याकडून कुणाला किती निधी मिळाला, याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फडणवीस मुख्यमंत्री असताना सेना आमदारांना किती निधी मिळत होता आणि ठाकरे सरकारच्या काळात किती निधी मिळाला, याचेही आत्मपरिक्षण शिवसेनेच्या आमदारांनी केले पाहिजे.”

Story img Loader