Ayodhya Ram Mandir Darshan : २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. या भव्य सोहळ्याला आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतर अयोध्या शहर पूर्णत: बदलून गेलं आहे. अंदाजे ८० हजार लोकसंख्या असलेल्या शहराला तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलं आहे. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दररोज लाखो भाविक येत आहेत. मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३० मार्च २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांचे आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत.
अयोध्या शहरात नेमकं काय बदललं?
अयोध्येत दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी मोठमोठी हॉटेल्स बांधण्यात आली आहेच. स्थानिक मिठाईच्या दुकानांची जागा रेस्टॉरंट्सनी घेतली आहे. राम मंदिरात बसविण्यात आलेल्या मूर्तीच्या प्रतिकृतींची विक्री केली जात आहे. हॉटेल्स आणि ढाब्यांमधील चहा-नाश्त्यांच्या मेनूमध्येही बदल दिसून येत आहे. दक्षिणेकडील भाविकांची संख्या वाढल्यामुळे पुरी-भाजीची जागा इडली-सांबारने घेतली आहे.
आणखी वाचा : भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले?
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दररोज अडीच लाखांहून अधिक भाविक अयोध्येत दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान, ज्या स्थानिकांची जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी संपादित करण्यात आली, त्या स्थानिकांनी अयोध्येतील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचा दारुण पराभव केला, असं मानलं जात आहे. निवडणूक पार पडल्यानंतर मंदिराच्या बांधकामाचा वेग मंदावला आहे, असंही काही स्थानिकांनी म्हटलं आहे. अयोध्येचे महापौर गिरीश पती त्रिपाठी म्हणतात, “शहरातील बहुतेक विकासकामे आणि मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या सुरू असलेली कामेदेखील लवकरच पूर्ण होतील.”
राम मंदिराचे बांधकाम प्रगतिपथावर
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराच्या बांधकामाचा सलग तीन दिवस आढावा घेतला. मुख्य मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३० मार्च २०२५ ही शेवटची मुदत दिली असल्याचं त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असल्यानं मंदिराच्या उर्वरित बांधकामाला अडथळे येत आहेत, असंही ते म्हणाले. सध्या प्रयागराजमधील महाकुंभातून दररोज लाखो भाविक अयोध्येत दर्शनासाठी येत आहेत. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्या असल्यामुळे अयोध्येत तीन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
नृपेंद्र मिश्रा म्हणतात, “मंदिराच्या अत्यंत खास कामाच्या बाबतीत काही अडचणी आहेत; परंतु एकूणच बांधकाम सुरळीत सुरू आहे. भाविकांच्या सुरक्षेला आम्ही पहिली प्राथमिकता दिली आहे. कुठलीही तडजोड न करता, आम्ही सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. राम दरबाराच्या बांधकामासह मुख्य मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे पांढऱ्या संगमरवरी मूर्ती बसविण्यात येणार आहेत. या मूर्ती कोरण्याचे काम जयपूरमध्ये सुरू आहे. बांधकामाच्या अंतिम टप्प्यात मंदिराच्या चोहोबाजूंच्या भितींचे काम पूर्ण केले जाईल.”
साधू-संतांच्या निवासासाठी अनेक मंदिरे
मंदिर परिसरात साधू-संतांसाठी सात लहान मंदिरेदेखील बांधली जात आहेत, जी त्या काळातील सामाजिक सलोख्याचे प्रतीक असतील, अशी माहितीदेखील मिश्रा यांनी दिली. बांधकामामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. हनुमान गढी मंदिराबाहेर रांगेत उभ्या असलेल्या प्रिया कुमारी यांनी सांगितले, “बिहारमधील १५ भाविकांबरोबर मी प्रयागराज येथील कुंभ मेळ्यासाठी आले होते. तिथे स्नान केल्यानंतर बुधवारी रात्री आम्ही प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आलो. रांगेत कितीही वेळ उभं राहावं लागलं तरी चालेल; पण रामलल्लाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही माघारी परतणार नाही.”
अयोध्येत विमानतळाचे काम झपाट्याने
दरम्यान, राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०२३ मध्ये अयोध्येत महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं होतं. त्याचं बांधकामही वेगानं सुरू असून, पहिल्या टप्प्यात २,२०० मीटर धावपट्टीचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, धावपट्टी एकूण ३,७५० मीटरची असल्यानं काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या अयोध्येतून दररोज १० ते १२ विमानं उड्डाणं करतात. त्यामधून सुमारे ४,००० प्रवासी प्रवास करतात. यापैकी जवळजवळ ९० टक्के विमानं दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, मुंबई व हैदराबादसारख्या शहरातून येतात. सुरुवातीला अयोध्येतून दररोज १७ ते १८ विमानं सुरू होती; परंतु ‘स्पाइसजेट’नं आपल्या उड्डाणांची संख्या कमी केल्यानं त्यात घट झाली आहे.
हेही वाचा : उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा? काय आहेत तरतुदी?
अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली, तर शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. त्यामुळे भाविकांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अयोध्येत मागील एका वर्षात जवळपास ६० व्यावसायिकांनी नवीन हॉटेल्सचं बांधकाम करण्यासाठी परवानगी घेतली आहे. मात्र काहींनी अद्याप कामं सुरू केलेली नाहीत. सध्या ताज ग्रुपसारख्या इतर हॉटेल्सचं बांधकाम वेगानं सुरू आहे. अयोध्येच्या महापौरांनी सांगितलं, “शहरात अनेक स्टार हॉटेल्स उपलब्ध आहेत; परंतु आम्ही भाविकांना स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या निवासस्थानांच्या बांधकामावर लक्ष केंद्रित करीत आहोत. सध्या १० हजार भाविकांना राहण्यासाठी आम्ही तात्पुरती सोय केली आहे.”
अयोध्येतील अनेक हॉटेल्सचे बांधकाम पूर्ण
अयोध्येतील एका हॉटेलचे मालक असलेले सौरभ कपूर म्हणतात, “गेल्या वर्षापासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे हॉटेल्सची मागणीदेखील वाढली. या वर्षी अनेक शहरांत अनेक हॉटेल्सची बांधकामं पूर्ण झाली आहेत. तरीदेखील भाविकांची फरपट होण्याची शक्यता आहे. कारण- कुंभ मेळ्यातून दररोज लाखो भाविक अयोध्येला दर्शनासाठी येत आहेत. त्यातच मौनी अमावास्या असल्यानं भाविकांची गर्दी आणखीच वाढण्याची शक्यता आहे. शहरातील बहुतांश हॉटेल्स आधीच बुक झालेली आहेत.”
अयोध्या विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते, शहरातील ६० टक्के कामं पूर्ण झाली असून, काही महत्त्वाची कामं अजूनही प्रलंबित आहेत. त्यामध्ये ‘पंचकोसी’ आणि ‘पंधराकोसी परिक्रमा मार्ग’ यांसारख्या कामांचा समावेश आहे. सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ८४ कोसी परिक्रमा मार्गाचे कामही संथ गतीने सुरू आहे. पूर्ण झालेल्या कामांमध्ये ४० मेगावॉट क्षमतेचा एनटीपीसी सौरऊर्जा प्रकल्प आणि सहा ‘रेल्वे ओव्हरब्रिज’चा समावेश आहे.