Uttar Pradesh Milkipur bypoll Election : उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी (५ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. हा मतदासंघ अयोध्या जिल्ह्यात येत असल्याने भाजपाने पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काही दिवसांपासून अयोध्येत ठाण मांडून आहेत. ऑक्टोबरपासून त्यांनी आठ वेळा मतदारसंघाला भेट दिली आणि भाजपा उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघात मोठमोठ्या सभादेखील घेतल्या. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढला.
लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजपाचा पराभव
रविवारी मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीकरिता होत असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. अखिलेश यादव हेदेखील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिल्कीपूरमध्ये आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील फैजाबाद मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला होता. समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांचा तब्बल ५४ हजार ५६७ मतांनी पराभव केला होता. राम मंदिर बांधूनही अयोध्येत भाजपाला पराभव स्वीकारावा लागल्याने याची बरीच चर्चा झाली होती.
आणखी वाचा : Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
‘सपा’कडून अवधेश प्रसाद यांच्या मुलाला उमेदवारी
दरम्यान, अवधेश प्रसाद हे आधी मिल्कीपूर विधानसभेचे आमदार होते. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि संसदेत प्रवेश केला. त्यामुळे मिल्कीपूरची जागा रिक्त झाली असून, त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने समाजवादी पार्टीने अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. मिल्कीपूर हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाला मागील तीन दशकांत येथे एकदाच विजय मिळवता आला आहे.
मिल्कीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार कोण?
२०१७ मध्ये मोदी लाटेत भाजपाने मिल्कीपूरची जागा जिंकली होती. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने पुन्हा ही जागा आपल्याकडे खेचून आणली. मिल्कीपूरची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपाने यावेळी तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. पक्षाने पासी समुदायातील तरुण नेते चंद्रभानू पासवान यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारादरम्यान स्थानिक दलित महिलांवरील अत्याचाराच्या दोन घटनांवरून भाजपा आणि ‘सपा’ नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य केले आहे.
समाजवादी पार्टीचा आक्रमक प्रचार
समाजवादी पार्टीच्या स्थानिक नेत्याने एका दलित तरुणीवर बलात्कार केल्याने भाजपा नेत्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. तर, दलित महिलेच्या हत्येवरून अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. समाजवादी पार्टीचे अयोध्या जिल्हाध्यक्ष पारसनाथ यादव म्हणतात की, पक्षाने गावोगावी प्रचार करताना दलित महिलेच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. बेपत्ता दलित मुलीच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. दलित समाजाची भाजपाविरोधात नाराजी आहे, असेही पारसनाथ यांनी म्हटले आहे.
मिल्कीपूरमध्ये कोणता फॅक्टर चालणार?
पारसनाथ यांनी दावा केला आहे की, भाजपाने मिल्कीपूरच्या पोटनिवडणुकीत बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. “चंद्रभानू पासवान हे रुदौली मतदारसंघातील असून, त्यांचा गुजरातमध्ये व्यवसाय आहे. महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत्यू आणि वाढती बेरोजगारी हे समाजवादी पक्षाने भाजपाविरोधात उपस्थित केलेले इतर मुद्दे आहेत”, असेही पारसनाथ यांनी सांगितले आहे. समाजवादी पार्टी नेहमीच जनतेच्या हिताचे काम करून मतदारांचा पाठिंबा मिळवते. अवधेश प्रसाद यांच्यापाठोपाठ अजित प्रसाद यांनीही मतदारसंघातील लोकांची मने जिंकली असल्याचे पारसनाथ यांनी सांगितले.
मिल्कीपूर मतदारसंघात किती मतदार?
मिल्कीपूर मतदारसंघात सुमारे तीन लाख ६० हजार मतदार आहेत. त्यामध्ये दलित मतदारांची (६५ ते ७० हजार पासी समाजाचे) संख्या एक लाख २५ हजार इतकी आहे. तर, ब्राह्मण मतदारांची संख्या ६० ते ६५ हजार आणि ५० ते ५५ हजार मतदार यादव समुदायातील आहेत. त्याशिवाय चौरसिया, मौर्य, विश्वकर्मा व चौहान यांसारख्या ओबीसी समुदायांमध्ये सुमारे ३० हजार मतदार आहेत. तर, मुस्लिम आणि ठाकूर मतदारांची संख्या अनुक्रमे ३० हजार आणि १८ हजारांच्या आसपास आहे.
पासी समाजातील सर्वाधिक मतदार अमानीगंज, हेरिंगटोंगंज व मिल्कीपूर या भागातील आहेत. तर हेरिंगटोंगंजमध्ये यादव समाजाचा दबदबा आहे आणि मिल्कीपूरमध्ये सर्व समाजांची मिश्र लोकसंख्या आहे. पासी समाजाच्या अनेक गावांतील पुरुष आणि महिला मतदारांनी त्यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला असणार हे स्पष्टपणे सांगणे टाळले आहे. स्थानिक दुकानदार विजय बहादूर यादव यांनी सांगितले, “दोन्ही उमेदवारांचे समर्थक पासीबहुल गावांमध्ये जाऊन जोरदार प्रचार करीत आहेत. कारण- या समुदायातील मतदार ज्या उमेदवाला पाठिंबा देईल, त्याचा विजय निश्चित आहे.”
भाजपाची घराणेशाहीवरून ‘सपा’वर टीका
दरम्यान, समाजवादी पार्टीने अवधेश प्रसाद यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपाचे नेते घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांना लक्ष्य करीत आहेत. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर अवधेश प्रसाद हे अहंकारी झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. भाजपाला मिल्कीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जिंकावीच लागेल, असेही ते म्हणाले. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अनेक स्थानिक नेते बेरोजगारी आणि मतदारसंघातील विविध प्रश्नांवरून भाजपा सरकारवर टीका करीत आहेत.
हेही वाचा : Telangana Politics : तेलंगणातील राजकारणात केसीआर ‘पुन्हा परत येणार’; एवढा काळ ते होते कुठे?
अखिलेश यादव सभेत काय म्हणाले?
सोमवारी हेरिंगटोंगंज येथील प्रचारसभेत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. “काही लोकांना असं वाटतं की, भगवे वस्त्र परिधान केल्यानं आपण योगी झालो. परंतु, माणूस त्याच्या कपड्यांमुळे नाही, तर विचारांमुळे योगी होतो. जे सत्याच्या मार्गावर चालतात, ते योगी असतात आणि सत्य लपवणारे कधीच योगी होऊ शकत नाहीत“, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. भाजपाकडून सरकार अधिकाराचा गैरवापर करत असून, हे सर्वसामांन्याच्या विरोधातील सरकार आहे, असेही अखिलेश म्हणाले.
भाजपा अयोध्येतील पराभवाचा वचपा काढणार?
गेल्या गुरुवारी अखिलेश यांच्या पत्नी व सपा खासदार डिंपल यादव यांनी अजित प्रसाद यांच्या प्रचारासाठी मिल्कीपूरमध्ये रोड शो केला. भाजपाने आपल्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी भाजपाच्या नऊ मंत्री आणि ४० आमदारांकडे दिली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे नेते नोव्हेंबरपासून मिल्कीपूरमध्ये तळ ठोकून प्रचार करीत होते. सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनीही मिल्कीपूरला भेट दिली आणि पक्षातील नेत्यांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे भाजपा मिल्कीपूरची निवडणूक जिंकून अयोध्येतील पराभवाचा वचपा काढणार की ‘सपा’ पुन्हा बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.