Ram Mandir consecration ceremony : २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या भव्य सोहळ्याला एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. रविवारी (६ एप्रिल) रामनवमीनिमित्त जगभरातील लाखो रामभक्तांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शनही घेतलं. आता पुढील महिन्यात राम मंदिरात आणखी एक भव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा ‘राजा राम’ म्हणून राज्याभिषेक केला जाणार आहे. त्यासाठी एप्रिलच्या अखेरीस मंदिराच्या पहिल्या मजल्यावर शाही दरबार उभारण्यात येणार आहे. दी इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

वृत्तानुसार, या समारंभासाठी सध्या मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जवळपास आठ हजार मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या समारंभाच्या तुलनेत यंदाचा समारंभ अत्यंत साधा आणि लहान असेल. या समारंभात मंदिराचा कळसही उभारला जाईल, अशी माहितीही मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राम मंदिराचे बांधकाम कधी सुरू झाले?

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमीबाबत ऐतिहासिक निकाल दिला होता. राम जन्मभूमीची संपूर्ण २.७७ एकर जमीन मंदिर प्रशासनाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याच वेळी मुस्लिम समाजाला मशीद बांधण्यासाठी एका चांगल्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेश सरकारला देण्यात आले. त्यानंतर २०२० मध्ये न्यायालयाने मंदिराचे बांधकाम करण्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. या समितीच्या देखरेखीखाली प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले.

आणखी वाचा : हिंदुत्त्वाच्या राजकारणात दाेन शिवसेनेमध्ये आक्रमपणाचा खेळ

राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा हे मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. मिश्रा यांनी अलीकडेच सांगितले होते, “राम मंदिरातील संकुलाचे बांधकाम एप्रिलच्या अखेरीस पूर्ण केले जाईल. तर, परकोटा आणि संकुलाच्या भिंतीचे उर्वरित बांधकाम २०२५ च्या अखेरीस पूर्ण होईल. मंदिरात सुमारे २०,००० घनफूट दगड बसवायचा आहे. मंदिरातील तटबंदीच्या बाहेर किंवा आत असलेल्या सर्व मूर्ती ३० एप्रिलपर्यंत येथे आणल्या जातील आणि जवळजवळ २५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान स्थापित केल्या जातील.”

प्रभू श्रीरामाची मूर्ती कुणी तयार केली?

अयोध्येतील प्रभू श्रीरामाची ३१ इंच उंचीची मूर्ती कर्नाटकमधील मूर्तिकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. ते प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुणच्या वडिलांनी गायत्री व भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. योगीराज सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्यांनी एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर एका कंपनीत नोकरीही केली. याआधी त्यांनी महाराजा जयचामराजेंद्र वडेयार यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळा, महाराजा श्री कृष्णराजा वाडियार चौथे यांचा पांढरा संगमरवरी पुतळा आणि म्हैसूरमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांचीही मूर्ती बनवली आहे.

इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही त्यांनीच तयार केला आहे. तर जयपूरमधील शिल्पकार प्रशांत पांडे यांच्या नेतृत्वाखाली २० कारागीरांची टीम पांढऱ्या मकराणा संगमरवरापासून राम दरबार तयार करीत आहेत. जिथे भगवान राम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व हनुमान यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जाणार आहेत. त्याशिवाय रामायणातील सर्वांत लोकप्रिय आवृत्ती असलेल्या रामचरितमानसची रचना करणारे संत तुलसीदास यांची एक महाकाय मूर्तीदेखील या संकुलात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : खडसे-महाजन यांच्यातील शाब्दिक युध्द विखारी वळणावर

राम मंदिराचे सुशोभीकरण कसे आहे?

राम मंदिर परिसरातील २० एकर जागेत सुशोभीकरण केले जाणार आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर हे पारंपरिक नागर शैलीमध्ये बांधण्यात आले आहे. या मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट आहे; तर रुंदी २५० फूट व उंची १६१ फूट आहे. राम मंदिरात एकूण ३९२ खांब आहेत. त्याशिवाय एकूण ४४ भव्य आणि मोठे दरवाजे बांधण्यात येणार आहेत. मंदिराच्या तळमजल्यावर गाभारा बांधण्यात आला आहे. त्यामध्ये भगवान श्रीरामाची बालस्वरूप मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाच्या दरबाराचे बांधकाम सुरू आहे. मंदिराचा दुसरा मजला विशेष कार्यक्रमांच्या आयोजनासाठी असेल. राम मंदिराव्यतिरिक्त त्याभोवती चार दिशांना आणखी चार भव्य मंदिरे असतील.

मंदिर प्रशासनाने काय माहिती दिली?

गेल्या वर्षी जेव्हा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता, तेव्हा गर्भगृहातील तळमजल्याचे सर्व बांधकाम पूर्ण झाले होते. मंदिरातील इतर मजले, मुख्य सर्पिल आणि संकुलातील इतर बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. तज्ज्ञांच्या मते, राम मंदिराचे बांधकाम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम या वर्षीच्या अखेरीस पूर्ण केले जाणार आहे. मुख्य मंदिर स्थळापासून सुमारे चार किमी अंतरावर असलेल्या इमारतीत आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयदेखील बांधले जात आहे, ज्यामध्ये भगवान रामाला जिवंत करणारा होलोग्राम, रामायणातील घटनांचा सखोल दौरा आणि २०० वर्षांच्या राम मंदिर चळवळीचा इतिहास सांगणारा एक भाग असेल. या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननादरम्यान सापडलेल्या वस्तूदेखील सार्वजनिकरीत्या पाहण्यासाठी संग्रहालयात प्रदर्शित केल्या जातील, अशी माहितीही राम जन्मभूमी ट्रस्टकडून देण्यात आली आहे.