‘आपल्याला उमेदवारी नाकारण्यामागे व भाजपमधून बाहेर पडण्यास पक्षाचे संघटनात्मक सरचिटणीस बी. एल. संतोष हे जबाबदार आहेत’ असे विधान माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर यांनी केल्याने कर्नाटक भाजपमधील अंतर्गत राजकारणात बी. एल. संतोष हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी असो वा शेट्टर यांना उमेदवारी नाकारणे किंवा उमेदवार निश्चित करण्यात संतोष यांचा शब्द अंतिम होता. संतोष यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दलही पक्षांतर्गत चर्चा होत असते.
भाजपमध्ये रा. स्व. संघाच्या माध्यमातून संघटनात्मक सरचिटणीसाची नियुक्ती केली जाते. पक्षांतर्गत व्यवस्थेत रा. स्व. संघातून येणारे संघटनात्मक सरचिटणीस शक्तिमान नेते मानले जातात. बोमारबेट्टू लक्ष्मीजनार्दन संतोष म्हणजेच बी. एल. संतोष यांचा शब्द भाजपमध्ये अंतिम मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापाठोपाठ पक्षात संतोष यांना महत्त्व आहे. भाजप आणि रा. स्व. संघातील दुवा म्हणून काम करणारे संतोष हे मूळचे कर्नाटकचे. यामुळेच कर्नाटकातील पक्षांतर्गत घडामोडींमध्ये त्यांचे अधिक लक्ष असते. विशेष म्हणजे मोदी आणि शहा हे सुद्धा कर्नाटकमध्ये संतोष यांच्या कलाने घेतात हे असेच अनुभवास येते.
अभियांत्रिकी पदवीप्राप्त संतोष हे रा. स्व. संघाचे मुख्य वेळ प्रचारक होते. उडपी जिल्ह्यात जन्म झालेल्या संतोष यांनी म्हैसूरू, शिमोगा या पट्ट्यात रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम केले आहे. येडियुरप्पा हे शिमोग्याचेच. येडियुरप्पा आणि संतोष यांचे सुरुवातीला एकदम सख्य होते. पण कालांतराने उभयतांमध्ये अंतर निर्माण झाले. दोन वर्षांपूर्वी येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या साऱ्या राजकीय घडामोडींमागे बी. एल. संतोष हेच होतो, असे बोलले जाते. येडियुरप्पा यांच्या समर्थकांनी तसा जाहीरपणे आरोप केला होता. तत्पूर्वी राज्यसभेचे उमेदवार ठरविताना येडियुरप्पा यांची शिफारस केलेली नावे डावलून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. यामागेही संतोष होते. कारण येडियुरप्पा यांनी शिक्षण सम्राट आणि एका बड्या नेत्याच्या नावाची शिफारस केली होती.
माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी आपल्याला उमेदवारी नाकारण्यामागे आणि भाजप सोडण्यास संतोष हे जबाबदार असल्याचा जाहीरपणे आरोप केला. तसेच आपल्याला उमेदवारी नाकारून संतोष यांनी त्यांच्या निकटवर्तीयाला उमेदवारी दिल्याचेही नमूद केले. शेट्टर यांनी संतोष यांना लक्ष्य केल्याने पक्षांतर्गत नाराज असलेल्या मंडळींनी संतोष यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
हेही वाचा – नगर शहरातील अशांततेवर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न
येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून बसवराज बोम्मई यांची निवड करण्यातही संतोष यांची भूमिका महत्त्वाची होती. संतोष यांना मुख्यमंत्रिपद भूषवायचे आहे, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे असते. पण संतोष यांनी त्याचा इन्कार केला होता. कर्नाटकातील उमेदवारांच्या यादीवर संतोष यांचा प्रभाव आहे. भाजपने सत्ता कायम राखल्यास संतोष अधिक शक्तिमान नेते होतील. पण सत्ता गमवावी लागल्यास पक्षांतर्गत त्यांचे महत्त्व कमी होईल का, याची पक्षाच्या नेत्यांना उत्सुकता आहे.