विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कर्नाटक भाजपामध्ये काही प्रमाणात अस्थिरता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपद तसेच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात आली नव्हती. नुकतेच भाजपाने कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र तथा आमदार बी. वाय. विजयेंद्र यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर कर्नाटकमधील भाजपच्या इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी आता येडियुरप्पा मैदानात उतरले आहेत.
अनेक नेते विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर नाराज
कर्नाटक भाजपामध्ये दोन गट आहेत. बी. एस. येडियुरप्पा यांच्या समर्थकांनी विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला आहे, तर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या गटातील नेत्यांनी मात्र विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. मे महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजयेंद्र यांनी शिकरीपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ येडियुरप्पा यांचा बालेकिल्ला मानला जातो.
येडियुरप्पा मैदानात, नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कर्नाटकातील भाजपाच्या अनेक नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. यामध्ये भाजपाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, आमदारा बसनगौडा पाटील यत्नल अरविंद बेल्लाड, माजी मंत्री के. एस. ईश्वराप्पा, व्ही. सोमन्ना आदी नेत्यांचा समावेश आहे. या महत्त्वाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर येडियुरप्पा मैदानात उतरले असून ते या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी वर्षाच्या एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने या निवडणुकीचे नेतृत्व विजयेंद्र यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला तुलनेने सोपी जावी, यासाठी येडियुरप्पा नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
रवी यांचा विजयेंद्र यांच्या नियुक्तीला विरोध
याआधी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नलीन कुमार कटील यांच्याकडे होती. कटील यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवी यांच्याकडेच सोपवली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, ऐनवेळी प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नेमणूक करण्यात आली. रवी हे संतोष यांच्या गटातील नेते मानले जातात. याच कारणामुळे रवी हे विजयेंद्र यांच्या नियुक्तीला विरोध करत आहेत. विजयेंद्र यांच्या नियुक्तीनंतर रवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विजयेंद्र यांच्या नियुक्तीनंतर घरणेशाहीचा पुरस्कार केला जाईल का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना “सध्यातरी प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे. यावर आम्ही १२ महिन्यांनी चर्चा करू. कारण या नियुक्तीवर आम्ही आताच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास या निर्णयाला विरोध केल्यासारखे होईल”, असे रवी म्हणाले.
ईश्वराप्पा यांनी केली टीका
रवी यांनी चिकमंगलूर या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. एच. डी. तम्मैया यांनी त्यांचा पराभव केला. तम्मैया येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ईश्वराप्पा यांनीदेखील विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे, याचा अर्थ भाजपाचे नेतृत्व ते एकटेच करतील असा नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेची निवडणूक आम्ही सगळेच सोबत लढवू, अशी प्रतिक्रिया ईश्वराप्पा यांनी दिली.
विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार?
दरम्यान, भाजपाने आता प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नियुक्ती केलेली असली तरी विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्तच आहे. त्यामुळे या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. मलाच विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी यत्नल आणि बेल्लाड यांना अपेक्षा आहे. लवकरच कर्नाटकमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची एक बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विजयेंद्र हे लिंगायत समाजातून येतात. यत्नल आणि बेल्लाड हे दोन्ही नेतेदेखील याच समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड होण्याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेतृत्व विरोधी पक्षनेतेपदासाठी वोक्कालिगा किंवा अन्य ओबीसी नेत्याची निवड करण्याची शक्यता आहे.