मुंबईतील काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता, माजी आमजार, माजी मंत्री आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी धक्कादायक आहे. मिलींद देवरानंतर एक महत्त्वाचा नेता पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसपुढची राजकीय वाटचाल तशी सोपी राहिलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्तेच्या, बेरजेच्या राजकारणात बाबा सिद्दीकीसारखे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या वादळात मुंबईतील काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला होता. १९९९ च्या निवडणुकीत थोडीबहोत उभारी आली, त्यावेळी जे काही थोडेथोडके आमदार निवडून आले, त्यात सिद्दीकी एक होते. त्याआधी १९९२ ते १९९७ या कालावधीत ते काँग्रेसचे नगरसेवक होते. अगदी लहान वयातच ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

हेही वाचा – निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी नगरमधील नेत्यांमध्ये स्पर्धा

अल्पसंख्याक बहुल वांद्रे पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आणि कार्यक्षेत्र. पक्षाचा साधा कार्यकर्ता, पदाधिकारी ते आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची पक्षाने संधी दिली. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले.

हेही वाचा – शरद पवार गटातील आमदारांचा अपात्रतेचा धोका टळला

मुंबई काँग्रेसमधील एक महत्त्वाचा नेता अशी सिद्दीकी यांची ओळख आहे. त्यांचा मुलगा आमदार झिशान हा मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होणे आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशा वेळी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार याबाबतही उलटसुलट चर्चा आहे. त्यांनी पक्ष का सोडला याचीही वेगवेगळी कारणे सांगितले जात आहेत. पक्षाअंतर्गत स्पर्धा हे एक कारण असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर आर्थिक हितसंबंध अबाधित ठेवण्यासाठी त्यांना काही राजकीय निर्णय घेणे भाग पाडल्याचीही चर्चा आहे. त्यांची भाजपमध्ये जाण्याची शक्यता कमी आहे, परंतु भाजपचा सध्या मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ते वाटेवर असल्याचे समजते. त्यांचा पुढील राजकीय प्रवासही लवकरच स्पष्ट होईल, असे सांगितले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddiqui loyal minority face of mumbai congress mumbai print news ssb
Show comments