मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : शिंदे-फडणवीस सरकार समर्थक आमदारद्वय बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात अनेक वादांचे विषय आणि कलगीतुऱ्यामुळे पारा चढलेला अमरावतीकरांनी यापूर्वीही पाहिला आहे. पण, आता नवीन वाक् युद्धात ‘गुवाहाटी’, ‘खोके’, ‘खिसे कापणे’, असे शब्द आल्याने शिवसेनेला आयते कोलीत मिळाले आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सातत्याने सुरू आहेत. जेव्हा मी निवडणुकीची तयारी करतो तेव्हा आम्ही रक्तदान करून अर्ज भरतो. पण आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाहीत, असा आरोप बच्चू कडू यांनी रवी राणांचे नाव न घेता केला होता.

हेही वाचा : महापालिका निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पुण्यातील गावे वगळण्याचा भाजप-शिंदे गटाचा राजकीय घाट

या आरोपांवर आमदार रवी राणा यांनी लगेच प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला, गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच तुम्हीसुद्धा एक किलो साखर वाटून गरिबांची दिवाळी साजरी करा, असा सल्ला दिला. मी गरिबी भोगली आहे, गोरगरिबाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी किराणा वाटतो असे राणा यांचे म्हणणे आहे. मात्र सत्तारूढ आघाडीतील नेत्यांच्या या अंतर्गत लाथाळ्या सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दर दिवाळीला राणा दाम्पत्य गरिबांना किराणा वाटप करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. याबद्दल त्यांनी टीकाही सहन केली आहे. पण, आता बच्चू कडूंनी राणांवर ‍’खिसे कापणारे’ असा शाब्दिक हल्ला केल्यानंतर राणांनीही त्यावर प्रत्युत्तर दिले.
रवी राणांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, तर बच्चू कडू हे शिंदे गट समर्थक आमदार आहेत. एकाच सरकारमध्ये सहभागी असले, तरी दोघांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दोघांचेही पक्ष, झेंडे वेगवेगळे. दोघांचीही पक्षविस्ताराची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत उभय नेत्यांमध्ये कडवट स्पर्धा दिसून येते.

हेही वाचा : बाळासाहेबांची शिवसेनेचे वायफायसह हायफाय कार्यालय; राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयास काॅर्पोरेट वळण

रवी राणा, बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्षाने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला आयतीच संधी मिळाली आहे. राणांनी बच्चू कडू यांच्यावर केलेला ‘तोडपाणी’चा आरोप किंवा आधी खिसे कापून नंतर किराणा वाटप करणारे म्हणून बच्चू कडूंनी राणांचा केलेला उल्लेख यात दोघांचेही म्हणणे खरे असल्याची खोचक प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून व्यक्त होत आहे. समाज माध्यमांवर अनेक प्रतिक्रिया गाजत आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: आपण रोज किती तास झोप घ्यायला हवी? कमी किंवा जास्त झोपेमुळे शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. यावेळी सहजरीत्या मंत्रिपद मिळेल, अशी आशा बच्चू कडू यांना होती. ती अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी आपली नाराजी उघड देखील केली. महाविकास आघाडीच्या सोबत असताना रवी राणा यांच्याकडून उद्धार करून घेण्याची वेळ बच्चू कडूंवर आली नव्हती. आता धुपाटणे हाती राहिले असल्याची बोलकी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacchu kadu ravi rana conflict on diwali faral grocery print politics news tmb 01
Show comments