Badlapur and Politics : बदलापूर ( Badlapur ) येथील नामांकित शाळेत एक अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दोन चिमुरड्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलं. शाळेत स्वच्छता कामगार म्हणून काम करणाऱ्या ‘दादा’नेच ते केलं. या मुली त्याला दादा हाक मारत होत्या. पण त्याने पाशवी कृत्य केलं. अक्षय शिंदे या आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद २० ऑगस्टच्या दिवशी उमटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ

बदलापूर ( Badlapur ) हे मुंबईला जोडलं गेलेलं एक उपनगर, ठाणे जिल्ह्यातलं शहर. या ठिकाणाहून रोज शेकडो प्रवासी मुंबई गाठत असतात आणि नंतर मुंबईतून आपलं घर गाठत असतात. कर्जत मार्गावर बदलापूर स्टेशन आहे. या बदलापूरमध्ये जी अत्यंत तळपायाची आग मस्तकाला जाणारी घटना घडली ती लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराची. यामुळे संपूर्ण बदलापूरच ( Badlapur ) २० ऑगस्टच्या दिवशी रस्त्यावर उतरलं होतं. ज्या नामांकित शाळेत ही बाब घडली तिथे तर बदलापूरकरांनी आंदोलन केलंच. पण सुमारे ९ तास रेल रोको केला. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा मोठा जनक्षोभ यावेळी पाहण्यास मिळाला. यानंतर सुरु झालं ते या घटनेवरुन राजकारण. लोकांचा जनक्षोभ उसळल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

हे पण वाचा- Badlapur Crime : “माझ्या मुलाला सोडा, मला..” बदलापूर आंदोलनातल्या मुलाला अटक होताच आईचा आक्रोश

बदलापूरच्या घटनेवरुन राजकारण कसं रंगलं?

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली की महायुती सरकारमधले नेते पीडिता मुलींना न्याय मिळवून देण्यात कसे अपयशी ठरत आहेत. लाडकी बहीण योजना तर सरकारने आणली पण बहिणीला सुरुक्षित ठेवण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल मविआच्या नेत्यांनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बदलापूरच्या ( Badlapur ) प्रकरणानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की “बदलापूरमधली नामांकीत शाळा ही भाजपाच्या लोकांशी संबंधित आहे असं मी वाचलं. मला यात राजकारण आणायचं नाही पण कुणीही असलं तरीही त्या व्यक्तीला सोडता कामा नये. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई आवश्यक आहे. १५०० रुपये देऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली आहे. मात्र महिला आणि मुलींच्या सुरक्षेचं काय?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.

बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन हे ठरवून झाले होते. पोलिसांचा अंदाज. (Photo – Loksatta)

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पोलिसांनी या प्रकरणातली FIR नोंदवून घ्यायला १८ तासांहून अधिक वेळ का लावला? कायदा आणि सुव्यवस्था यांचं हे संपूर्णपणे अपयश आहे. राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेता येत नसेल तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे.” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे?

जयंत पाटील यांनीही अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं. “या महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. आधी नवी मुंबईत यशश्री शिंदेची हत्या झाली. आता बदलापूरमध्ये मुलींवर अत्याचार झाला. सरकारला वाटतं लाडकी बहीण योजनेचा निधी दिला की त्यांची जबाबदारी संपली. राज्यात महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे.”

विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे

या प्रतिक्रियानंतर जेव्हा दिल्लीत गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले, “बदलापूर प्रकरण हे गंभीर आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. विरोधकांनी या घटनेचं राजकारण करु नये. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत तर मला आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी किमान अशा प्रसंगांमध्ये राजकारण करु नये कारण हे त्यांना शोभत नाही. मात्र ठीक आहे, अशा प्रकारच्या संवेदनशील घटनांमध्येही सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंना राजकारण करायचं आहे असंच दिसून येतं आहे.” असं फडणवीस म्हणाले.

बदलापूरबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

बदलापूरच्या ( Badlapur ) घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरुन माध्यमांशी संवाद साधला. “बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पॉक्सो आणि इतर कायद्यान्वये गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात केली जाईल.” असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं.

दीपक केसरकर यांनी काय माहिती दिली?

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. “विशाखा समितीतर्फे शाळांमधील या अत्याचाराच्या घटनेकडे पाहिलं जाईल. तसंच असे प्रकार घडू नयेत यासाठी शाळा योग्य खबरदारी घेत आहेत ना? हे पाहण्याचं कामही ही समिती करेल. ज्या नामांकित शाळेत हे प्रकरण घडलं त्या शाळेला आम्ही नोटीस बजावली आहे. तसंच मुख्याध्यापक, शिक्षक आणि त्यांचे दोन सहकारी यांना निलंबित केलं आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा काम करत नव्हतो. तसंच तक्रारीसंदर्भातला बॉक्सही लावण्यात आलेला नाही. या गोष्टी का घडल्या त्याचीही चौकशी आम्ही करतो आहोत.” असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

बदलापूरमध्ये घडलेली घटना आणि त्यानंतर उसळलेला जनक्षोभ तसंच आलेल्या या प्रतिक्रिया महाराष्ट्रात एका घटनेने कसं राजकीय वादळ आणलं ते सांगणाऱ्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur incident stirs political storm in poll bound maharashtra scj