Badnera Vidhan Sabha Constituency : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्‍याने प्रीती बंड यांचे समर्थक आक्रमक

UBT Shivsena Sunil Kharate in Badnera Vidhan Sabha Constituency : बडनेरा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्‍हाप्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर इच्‍छुक उमेदवार प्रीती संजय बंड यांच्‍यासह त्‍यांच्‍या समर्थकांना धक्‍का बसला आहे.

UBT Shivsena Sunil Kharate in Badnera Vidhan Sabha Constituency
Badnera Vidhan Sabha Constituency : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्‍याने प्रीती बंड यांचे समर्थक आक्रमक (image credit – प्रिती संजयराव बंड/fb/file pic)

Badnera Assembly Election 2024 : बडनेरा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्‍हाप्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर इच्‍छुक उमेदवार प्रीती संजय बंड यांच्‍यासह त्‍यांच्‍या समर्थकांना धक्‍का बसला आहे. आमदार रवी राणा यांना पराभूत करण्‍यासाठी प्रीती बंड यांच्‍याकडे सक्षम उमेदवार म्‍हणून पाहिले जात होते, पण त्‍यांना उमेदवारी नाकारणे हा शिवसैनिकांवर अन्‍याय असून रवी राणांच्‍या विरोधात डमी उमेदवार देण्‍यात आला आहे, असा आरोप प्रीती बंड यांच्‍या समर्थकांनी केला आहे.

उमेदवारी नाकारल्‍यानंतर प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना प्रीती बंड म्‍हणाल्‍या, मला अगोदर कामाला लागा असे सांगण्‍यात आले. यामुळे मी गेल्‍या अनेक दिवसांपासून पदयात्रा आणि मतदारांच्या भेटी सुरू केल्या होत्या. मात्र, आता ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतलाय, त्यानंतर कोणाशी काय बोलावे हे सुचतच नाहीये. गेल्‍या चार दशकांपासून बंड कुटुंबीय शिवसेनेसोबत (ठाकरे गट) एकनिष्ठ आहेत. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे सर्व शिवसैनिकांनी पैसे गोळा करू आणि निवडणूक लढवू असे ठरवले. त्या दृष्‍टीने सगळे कामाला देखील लागले होते. मात्र, अचानक काय झाले, हे कळायला मार्गच नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिक आहोत. पण आता नेमके काय करायचे हे या क्षणी सुचत नाहीये. याबाबत एक-दोन दिवसात शांततेने विचार करू, असे देखील प्रीती बंड म्हणाल्या.

हेही वाचा – सूरत, गुवाहाटीपर्यंत साथ देणाऱ्या ४१ पैकी ३७ आमदारांना शिंदेंकडून पुन्हा उमेदवारी; उर्वरित चार जणांचे काय?

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सुनील खराटे यांचे नाव जाहीर होताच, प्रीती बंड यांचे शेकडो समर्थक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पक्षाने हा चुकीचा निर्णय घेतला आहे. सुनील खराटे हे पाच ते सात वर्षांपूर्वी शिवसेनेत आले, त्यांना थेट जिल्हाप्रमुखाची जबाबदारी देण्‍यात आली. मात्र, ते आपली जबाबदारी कधीही पार पाडू शकले नाहीत. कुठले आंदोलन त्यांनी केले नाही, अशी टीका प्रीती बंड यांच्‍या समर्थकांनी केली आहे.

हेही वाचा – Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?

प्रीती बंड या दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत. संजय बंड हे शिवसेनेच्‍या उमेदवारीवर तीन वेळा निवडून आले होते. २०१८ मध्ये संजय बंड यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात प्रीती बंड यांना २०१९ मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत प्रीती बंड यांचा रवी राणा यांनी पराभव केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Badnera maharashtra assembly constituency election 2024 ubt shivsena sunil kharate priti sanjay band navneet rana latest updates print politics news ssb

First published on: 24-10-2024 at 18:21 IST
Show comments