मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पैशांवरून बहुजन समाज पक्षात (बसप) संघर्ष निर्माण झाला आहे. पक्षाला मिळालेला निधी काही जणांनी परस्पर हडप केल्याची तक्रार येताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या चौकशीनंतर काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बसप’ने या लोकसभेला राज्यातील ४८ पैकी ४७ जागा लढविल्या होत्या. वाशिम – यवतमाळ मतदारसंघात ‘बसप’कडून बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड उमेदवार होते. येथे शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होती. राजश्री पाटील या मतदारसंघाबाहेरच्या असल्याने त्यांना येथे निवडणूक अडचणीची झाली होती. या निवडणुकीदरम्यान ‘बसप’ उमेदवाराला एका पक्षाकडून ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली. पण ती मदत ‘बसप’च्या तत्कालीन उपाध्यक्षाने राठोड यांच्यापर्यंत पोहचवलीच नाही. राठोड यांनी निवडणूक संपल्यावर त्यासंदर्भात लेखी तक्रार ‘बसप’ प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्याकडे केली. शिवसेना शिंदे गटाकडून ही मदत देण्यात आली होती, असे बसपच्या उमेदवाराचे म्हणणे आहे.

‘बसप’ची राज्य कार्यकारणीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ५० लाखांच्या निधीची चर्चा झाली. या प्रकरणानंतर ‘बसप’चे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह अनेकांचे राजीमाने घेण्यात आले आहेत. तसेच पैसे पोहचले नसल्याची ज्यांनी तक्रार केली, त्या हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा ‘बसप’ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे.- रामजी गौतम, ‘बसप’ राज्य प्रभारी व माजी खासदार

वाशिम- यवतमाळच्या ‘बसप’ उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी आमच्या पक्षाने पैसे पुरवल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. ‘बसप’ हा महायुतीचा विरोधी पक्ष आहे, त्यांना आम्ही निवडणूक निधी पुरवण्याचा प्रश्नच येत नाही. – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahujan samaj party clashed over money in the lok sabha elections print politics news zws