दिंगबर शिंदे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : लोकसभेमध्ये सांगलीचे प्रतिनिधीत्व सध्या भाजपकडे असले आणि तीन महिन्यावर आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपसमोर पक्षांतर्गत बरोबरच काँग्रेसचे आव्हान समोर दिसत असताना वंचित बहुजन आघाडीकडूनही या जागेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गत निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या जोरावर वंचित आघाडीचा दावा प्रबळ असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

सांगली मतदार संघात गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगलीची काँग्रेसची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देत असताना वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या उसनवारीच्या उमेदवारीसह दिली होती. तिरंगी लढतीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील हे सलग दुसर्‍यांदा विजयी झाले तर वंचित आघाडीने तृतिय स्थान पटकावत सुमारे तीन लाखावर मतदान झाले होते. यामुळे भाजपचा विजय सुकर होण्यास मदतच झाली हे उघड गुपित आहे. वंचितच्या उमेदवारीवर मैदानात उतरलेले गोपीचंद पडळकर यांना या बदल्यात भाजपने विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची दिलेली संधी म्हणजे एक प्रकारचा मोबदलाच मानला पाहिजे.

आणखी वाचा-मराठवाड्यात खासदार निधी खर्च करण्यात प्रीतम मुंडे मागील बाकावर

आता लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातील डफ, हालगी वाजू लागली असून या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सांगली दौरा होता. त्यांनी सांगलीत सत्ता संपादन निर्धार सभा घेउन निवडणुकीचे शिंग फुंकत असताना भाजपवर टीका केली. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे सांगलीत भाजपला फायदा झाला की नाही हे त्यांनी कथन केले नाही. आताही त्यांची वाटचाल भाजपेतर इंडिया आघाडीच्या दिशेने असली तरी इंडियांने अद्याप त्यांच्यासाठी दारे उघडली नाहीत. जर इंडियात वंचित आघाडी सहभागी झाली तर त्यांच्याकडून सांगलीच्या जागेवर मागील मतदानाच्या जोरावर आग्रह धरला जाण्याची शययता दिसत आहे. मात्र, भाजपला समर्थपणे तोंड देईल असा बहुजन वंचित आघाडीकडे सध्या तरी सक्षम चेहरा दिसत नाही. तरीही जागेचा आग्रह कायम ठेवून गत वेळच्या प्रमाणे स्वाभिमानीने जशी जागा पदरात पाडून घेत असताना उमेदवारही काँग्रेसकडून उसनवारीवर घेतला तीच गत यावेळीही झाली तर आश्‍चर्य वाटायला नको.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये सांगलीचा काँग्रेसचा गड खालसा करण्यात भाजपला यश आले. त्यानंतर २०१९ मध्ये वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला पुन्हा गड काबिज करता आलेला नाही. आताही जिल्ह्यात भाजपमध्ये निर्माण झालेली गटबाजीमुळे काँग्रेसला संधी दिसत असताना हे नवे संकट पुढे येत आहे. जरी वंचित आघाडी इंडियामध्ये सहभागी झाली नाही तर उमेदवार रिंगणात उतरणार हेही आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. सभेपुर्वी त्यांनी मिरजेत दर्ग्याला दिलेली भेट, मुस्लिम कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद पाहता काँग्रेसच्या मतावर त्यांचा अधिक डोळा दिसत आहे.

आणखी वाचा-अधिवेशन फक्त दहा दिवसांचे , विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळणार ?

भाजपमध्येही विद्यमान खासदार संजयकाका पाटील हे तिसर्‍यांदा खासदारकीसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी लोकसभेसाठी उमेदवारीची तयारी सुरू केली असून त्यांनी मतदार संघात संपर्कही वाढविला आहे. खासदार पाटील यांच्यापासून दूर गेलेल्या विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपलेसे करून दौरेही सुरू केले आहेत. खासदारांवर नाराज मंडळींना एकत्र करून पक्षांतर्गत उमेदवारीची लढाई अधिक जिकीरीने लढवण्याचे त्यांचे मनसुबे सध्या आहेत. यातूनच जर पुन्हा जुन्यांना संधी मिळाली तर नाराज मंडळी एकत्र येउन काय करतील याचीही माहिती हस्ते परहस्ते पक्ष नेतृत्वापर्यंत पोहचविण्याचेही प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र, भाजपमधील गटबाजीचा फायदा काँग्रेसला निर्धोकपणे घेता येउ शकेल असे वंचित आघाडीच्या मोर्चेबांधणीवरून सध्या तरी वाटत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahujan vanchit aaghadi claim on seats in sangli for upcoming elections is trouble for congress print politics news mrj