अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला व वाशीम जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने तडजोडीचे राजकारण स्वीकारले. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने समन्वयाची भूमिका घेत बाळापूर मतदारसंघातून भाजपचे बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली. तीन महिन्यांपूर्वी विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या आमदार भावना गवळी यांना पक्षाने रिसोडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यासाठी त्या स्वत:च आग्रही होत्या. महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटला तरी उमेदवार हा भाजपतून दिला. यामध्ये मतदारसंघांमधील समीकरणांसह जातीय राजकारण देखील महत्त्वपूर्ण असल्याचा अंदाज आहे.

बाळापूर आणि रिसोडसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपने अखेर महायुतीत दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडले. बाळापूर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटात अनेक जण इच्छूक होते. उमेदवारी मिळत असल्यास काहींनी पक्ष प्रवेशाची देखील तयारी दर्शवली होती. त्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांसह बळीराम सिरस्कार यांचा देखील समावेश होता. बाळापूर शिवसेनेसाठी सुटला असला तरी उमेदवारी मात्र भाजपतील बळीराम सिरस्कार यांना देण्यात आली. सिरस्कारांनी बाळापूर मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले. २००९ मध्ये ते भारिप-बमसं समर्थित अपक्ष, तर २०१४ मध्ये भारिप-बमसंच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत बाळापुरातून पत्ता कट केला. त्यामुळे नाराज झालेल्या सिरस्कारांनी वंचितला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत गेले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी देखील सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. बाळापूरमधून त्यांची तयारी सुरू असतानाच मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला. त्यानंतर ते शिंदे गटाच्या संपर्कात गेले. शिवसेनेने देखील उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. भाजपनेच उमेदवारीसाठी सिरस्कारांना शिंदे गटात पाठवले, हे उघड गुपित आहे. बाळापूर मतदारसंघासह जिल्ह्यात माळी समाजाची मोठी मतपेढी आहे. हे लक्षात घेऊनच महायुतीने सिरस्कारांना संधी दिल्याचे बोलल्या जाते. बाळापूरमध्ये दोन्ही शिवसेना व वंचित आघाडीत तिरंगी सामना होणार आहे.

हेही वाचा >>>तिकीट वाटपात विजय वडेट्टीवार यांची खासदार धानोरकर यांच्यावर मात

जुलै महिन्यात विधान परिषदेच्या सदस्यत्वपदी वर्णी लागलेल्या भावना गवळी अवघ्या तीन महिन्यातच विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. २५ वर्ष खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे गवळींसह त्यांचे समर्थक नाराज झाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्यवेळी सन्मान केला जाईल, असा शब्द दिला. लोकसभेत शिंदे गटाने उमेदवार बदलल्यावर यवतमाळ-वाशीममध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जुलै महिन्यांमध्ये भावना गवळी यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. तरीही त्या रिसोडमधून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक राहिल्या. शिंदे गटाने त्यांनाच रिसोडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या निर्णयामुळे भाजपतील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. त्यामुळे रिसोड मतदारसंघात बंडखोरी होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

महायुतीमध्ये अस्वस्थता

बाळापूर व रिसोडच्या बाबतीत शिवसेना शिंदे गटाने घेतलेल्या निर्णयावर काही पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर निघाला आहे. भाजपतील इच्छुकांमध्ये देखील असंतोषाचे वातावरण असून महायुतीमध्ये अस्वस्थता पसरली. त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.