नगर : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भाजपची वाट पत्करल्यावर नगर जिल्ह्याची काँग्रेसची सारी सुत्रे ही बाळासाहेब थोरात यांच्याकडे आली. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेची घसरण थोपविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले पण आता जिल्हाध्यक्षच वेगळा विचार करू लागल्याने थोरात यांच्यासमोर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पतीकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी तर पत्नीकडे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी. असे उदाहरण असलेला नगर जिल्हा महाराष्ट्रात काँग्रेससाठी अपवादात्मक समजला जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विश्वासाने ही जबाबदारी श्रीगोंद्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्यावर सोपवली. राजेंद्र नागवडे हे काँग्रेसचे निष्ठावंत आणि राज्य साखर संघाचे अध्यक्षपद मिळवलेले नेते शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले नागवडे पती-पत्नी आता वेगळी वाट चोखळण्याची चिन्हे दिसू लागल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. नागवडे यांची ही वेगळी वाट ज्येष्ठ नेते थोरात यांच्यासाठी धक्का असणार आहे.
हेही वाचा – ओबीसी नेत्यांनाही महत्त्व
ऐकेकाळचे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, श्रीगोंद्यातील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नागवडे यांच्या ९० व्या जयंती कार्यक्रमाला एकाही काँग्रेस नेत्याला निमंत्रित न करता सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसशी सख्य नसलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करुन राजेंद्र नागवडे यांनी एकप्रकारे धक्का देत आपल्या वाटचालीची दिशा निश्चित केल्याचे मानले जाते. उपमुख्यमंत्री पवार यांनीही राजेंद्र नागवडे यांना आपण श्रीगोंद्यात राजकीय ताकद देऊ, असे सांगत त्यांच्या स्वागतासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वहात असले तरी श्रीगोंद्यातील ही घटना म्हणजे, त्यानंतर लगेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी इच्छुकांनी सुरु केल्याचेही मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांचा हा श्रीगोंद्यातील पहिलाच कार्यक्रम होता. श्रीगोंदा हा पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाला सर्वार्थाने जवळचा जिल्हा. भौगोलिक दृष्ट्या लगत तर आहेच शिवाय श्रीगोंद्यातील ऊस नेण्यासाठी बारामतीसह पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने नेहमीच सक्रियता दाखवतात. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाटपाणी उपलब्ध असलेला हा तालुका. साखर कारखानदारीच्या माध्यमातून श्रीगोंदा आणि पुणे जिल्ह्यात अनेक राजकीय सोयरीकी जुळल्या जातात.
श्रीगोद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे साखर कारखानदारीतून बारामतीशी राजकीय वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी सन २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांनी श्रीगोंद्यात लक्ष घालून पाचपुते यांचा पराभव घडवून आणला होता. सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेल्या पक्षांतराच्या राजकीय उड्या हा विषय तसा नवीन नाही. मात्र श्रीगोंद्यातील साखर कारखानदारांची त्यात आघाडी आहे. पाचपुते या मतदारसंघातून सहावेळा, प्रत्येक वेळी स्वतंत्र पक्षचिन्हावर निवडून आलेले आहेत. आता त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी काकांविरुद्ध बंड पुकारत ठाकरे गटाची वाट पकडलेली आहे. राजेंद्र नागवडे यांनीही गतकाळात भाजपशी जवळीक साधलीच होती.
हेही वाचा – भाजपची उमेदवारी कोणाला आणि काँग्रेसला सूर गवसणार का ?
श्रीगोद्यातील आणखी एक साखर कारखानदार, माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी विधानसभेची परिस्थिती लक्षात घेतली तर नागवडे यांना केवळ अजितदादा गटाचा पर्याय शिल्लक राहिला होता. उपमुख्यमंत्री पवार यांना निमंत्रित केलेल्या व्यासपीठावर आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करायचीच, अशी घोषणाही राजेंद्र नागवडे यांनी करुन टाकली. ते किंवा त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे निवडणूक लढवतील, हेही त्यातून स्पष्ट होते.
नगर जिल्ह्यातील एक दिग्गज नेते राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते जिल्हाध्यक्षही श्रीगोंद्यातीलच होते. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद बराच काळ रिक्तच होते. थोरात यांनी बराच शोध घेत बाळासाहेब साळुंखे नामक कार्यकर्त्याची या पदावर वर्णी लावली. परंतु थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याने साळुंके यांच्यावर पद गमावण्याची वेळ आली. त्यानंतर थोरात यांनी नागवडे पती-पत्नीवर जिल्हाध्यक्षपदाची दुहेरी जबाबदारी सोपवली. तेच नागवडे दांपत्य आता वेगळी राजकीय वाट चोखळण्याच्या प्रयत्नात आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या घसरणीची ही वाटचाल सावरणार तरी कशी, याकडे जिल्ह्यातील काँग्रेसजनांचे लागले आहे.