तुकाराम झाडे
हिंगोली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरंभलेली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जाेडाे पदयात्रेला ठिकठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. विविध घटकातील नागरिक पदयात्रेत सहभागी हाेत आहेत, हर्षाेल्हासाने स्वागत करत आहेत. खासदार गांधींच्या पदयात्रेविषयी प्रचंड उत्सुकता, कुतुहल असून माेठ्या अपेक्षा निर्माण केल्या असून अंतःकरणाला भिडणारी ही भारत-जाेडाे आहे, असे मत यात्रेचे समन्वयक तथा माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थाेरात यांनी येथे व्यक्त केले.
कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड पाठाेपाठ हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुल गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही थाेरात यांनी सांगितले.
हेही वाचा : राहुल गांधी रमले कुस्तीचे डाव पाहण्यात
कळमनुरी येथे ते पत्रकारांशी संवाद साधताना बाेलत हाेते. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, खासदार गांधींची पदयात्रा नांदेड नंतर हिंगोली जिल्ह्यात पोहोचताच अतिउत्साच्या वातावरणात स्वागत केले गेले. तुळजाभवानीच्या महाद्वारची प्रतिकृती, गजराजांच्या साक्षीने हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. बंजारा समाजातील भगिनी, तरुणांचा सहभाग मोठा दिसला. येथील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने स्वागतात काही कमी ठेवले नाही. लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातूनही हजारो लोक पदयात्रेच्या स्वागताला आले होते.
पदयात्रेबद्दल सामान्य जनतेमध्ये उत्सुकता, कुतुहल आणि राहुल गांधी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे दिसते. महागाई, रोजगार, शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना पदयात्रेच्या माध्यमातून हात घातला जात आहे. राहुल गांधी वंचित, पीडित, सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेत त्यांना आधार देत आहेत. पदयात्रेला शिवसेनेने पाठिंबा दिला व युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतल्याने त्यांच्यावर केली जात असलेली टीका अनावश्यक ठरली आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी शिवसेना भारत जोडो यात्रेत सहभागी होत असेल तर हे स्वागतार्ह आहे. लोकशाही व संविधान वाचवणे भाजपाला मान्य नाही का? असा सवाला विचारून बाळासाहेब ठाकरे यांनी त्या- त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतलेले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. हे भाजपाला माहिती नाही का? प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपाने माहिती घ्यावी व नंतर बोलावे, असा टोलाही थोरात यांनी लगावला. या पत्रकार बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार प्रज्ञा सातव आदी उपस्थित होते.