पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या ५७ वर्षांनंतर पहिल्यांदाच निकालाची उत्सुकता असणार आहे. आतापर्यंत बारामतीचा निकाल हा एकतर्फी असायचा; पण यंदाची निवडणूक ही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय असंतोषाच्या लढाईपेक्षा बारामतीचा नवा वारसदार कोण, हे ठरविणारी असणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमधील मनभेदांनंतर अजित पवार आणि युगेंद्र पवार या काका-पुतण्यांची बारामतीवरील वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे बारामतीकरांना रुचले नव्हते. खासदार सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एक लाख ५३ हजार मतांनी पराभव केला होता. बारामतीकरांचा हा कल पाहिल्यावर अजित पवार हे या वेळी बारामतीतून निवडणूक लढवायची की नाही, या संभ्रमात पडले होते. त्यांनी शिरूर किंवा पुरंदरमधून निवडणूक लढविण्याचा पर्याय तपासून पाहिला. थोडे भावनिक वातावरण तयार झाल्यावर बारामतीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीनंतर तयारीला सुरुवात केली होती. युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये ‘स्वाभिमानी यात्रा’ काढून गावागावांमध्ये भेटी दिल्या. तेव्हाच त्यांना उमेदवारी मिळणार, याचा अंदाज बांधण्यात येत होता. त्यानुसार त्यांना उमेदवारी दिल्यामुळे काका-पुतण्यांची ही लढाई म्हणजे बारामती ही नवीन पिढीच्या ताब्यात द्यायची की जुन्या पिढीच्या हातात कायम ठेवायची, याचा निर्णय बारामतीकर घेणार आहेत.

हेही वाचा >>>महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा

निर्णायक मुद्दे

● अजित पवार हे विकासाच्या मुद्द्यावर भर देत आहेत. बारामतीचा विकास कसा केला, हे बारामतीकरांच्या मनावर ते बिंबवत आहेत. मात्र, शरद पवार यांनी दिलेल्या संधीमुळे अजित पवार यांना सत्तेत विविध पदे आणि बारामतीकरांनी साथ दिली आणि आता त्यांनीच साथ सोडल्याची बाब राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रचाराचा मुद्दा करण्यात आला आहे.

● बारामतीवर पवार कुटुंबाचे १९६७ पासून वर्चस्व राहिले आहे. १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांनी पहिल्यांदा शरद पवार यांना निवडून दिले. त्यानंतर सलग सहा वेळा शरद पवार यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. शरद पवार हे केंद्रात काम करत असताना अजित पवार यांना १९९१ मध्ये पहिल्यांदा संधी देण्यात आली. या वेळी घरातीलच उमेदवार समोर असल्याने आणि त्याच्या पाठीशी शरद पवार असल्याने अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक झाली आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महाविकास आघाडी : १,४३,९४१

● महायुती : ९६,५६०

Story img Loader