गेल्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. तेव्हापासून कर्नाटक भाजपातील वेगवेगळ्या कारणामुळे मतभेद समोर आले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे मतभेद सार्वजनिक झाले. ही नियुक्ती होऊन साधारण दीड महिना उलटला आहे. तरीदेखील कर्नाटक भाजपातील हा असंतोष अद्याप शमलेला नाही. त्याचीच एक झलक शनिवारी (२३ डिसेंबर २०२३) पाहायला मिळाली. विजयेंद्र यांनी आपल्या गटातील काही नेत्यांना महत्त्वाची पदे दिल्यामुळे विरोधी गटातील नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे.
नव्या कार्यकारिणीवर नेते नाराज
विजयेंद्र यांनी शनिवारी पक्षाच्या कार्यकारिणीवर नेत्यांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती केली. या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर येडियुरप्पा यांच्या विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील भाजपा पक्ष आता ‘केजेपी-२’ झाला आहे, अशी टीका येडियुप्पा यांच्या विरोधकांनी केली.
येडियुरप्पा यांच्या केजेपी पक्षाचा संदर्भ
येडियुरप्पा यांनी २०१२ साली भाजपाला सोडचिठ्ठी देत स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. या पक्षाला त्यांनी कर्नाटक जनता पक्ष (केजेपी) असे नाव दिले होते. या पक्षाने २०१३ सालची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मात्र येडियुरप्पा यांचा पक्ष अवघ्या सहा जागांवर विजयी झाला होता. या पक्षामुळे भाजपाला चांगलाच फटका बसला होता. भाजपाला फक्त ४० जागांवर विजय मिळवता आला होता. परिणामी काँग्रेस पक्षाचा त्या निवडणुकीत विजय झाला होता. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी भाजपात प्रवेश करत केजेपी हा पक्ष भाजपात विसर्जित केला होता. याच पक्षाचा संदर्भ देत पक्षातील अंतर्गत विरोधकांनी येडियुरप्पा यांच्यावर ‘केजेपी-२’ असा उल्लेख करत टीका केली.
यत्नल यांनी उघड नाराजी
येडियुरप्पा यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले बसनगौडा पाटील यत्नल, व्ही सोमन्ना आदी नेते विजयेंद्र यांच्यावर नाराज आहेत. विजयेंद्र यांनी सोईच्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिल्यामुळे ते नेते नाराज आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळेल अशी अपेक्षा यत्नल यांना होती. मात्र ऐनवेळी विजयेंद्र यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. त्यावेळीदेखील यत्नल यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
“कर्नाटकमध्ये भाजपा पक्ष हा केजेपी-२”
कर्नाटक भाजपात नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांबाबत बोलताना कानडी भाषेतील केजीएफ या प्रसिद्ध चित्रपटाचा संदर्भ देत यत्नल यांनी कर्नाटकच्या सध्याच्या भाजपाला केजेपी-२ असे म्हटले. ” केजेपी-१ हा येडियुरप्पा यांचा पक्ष होता. आता केजेपी-२ हा विजयेंद्र यांचा पक्ष आहे. येडियुरप्पा यांच्या नातवाचा केजेपी-३ हा पक्ष असेल,” अशी खोचक टिप्पणी यत्नल यांनी केली.
“पक्षाच्या चाव्या चोरांच्या हाती”
कर्नाटक भाजपामध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे, तो फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंतच असेल. नंतर हे सर्व नेते पायउतार होतील, असे भाकित यत्नल यांनी व्यक्त केले. “भाजपाच्या चाव्या चोरांच्या हाती देण्यात आलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा २८ जागांवर विजय न झाल्यास केंद्रातील नेते या चाव्या परत घेतील,” असे यत्नल म्हणाले.
नव्या कार्यकारिणीत कोणाचा समावेश?
दरम्यान, विजवेंद्र यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या प्रदेश कार्यकारिणीत एकूण १० उपाध्यक्ष आहेत. यात माजी मंत्री मुरुगेश निराणी, बायराती बसवराजू आदी नेत्यांचा समावेश आहे. माजी मंत्री व्ही सुनील कुमार, माजी आमदार पी राजीव, एनएस नंदीश रेड्डी, प्रीतम गौडा यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत एकूण १० सचिव आहेत.