Karnataka BJP Expel Basangouda Patil Yatnal: कर्नाटक भाजपामध्ये अंतर्गत राजकारणाने दुफळी माजली आहे. सत्तेबाहेर असलेल्या भाजपाला संघटनेतील वादाचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि त्यांचे सुपुत्र खासदार विजयेंद्र येडियुरप्पा यांच्याविरोधात घराणेशाहीची टीका केली. या टीकेनंतर बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन झाल्यानंतरही यत्नाळ आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

बीएस येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबाने कर्नाटक भाजपाला स्वतःची कौटुंबिक मालमत्ता बनवले, असा आरोप यत्नाळ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे राजकारण संपविण्याची भाषा वापरतात. मात्र कर्नाटकमध्ये त्यांच्या या संकल्पाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना यत्नाळ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणाविरोधात बोलत असतात. जे मोदी बोलतात, त्याचीच री मी ओढली, तर मला पक्षातूनच निलंबित करण्यात आले. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणार नाही.”

पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी यत्नाळ यांनी भाजपाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी हे आदर्श नेते होते, त्यांच्या विचारांवर आपण काम करत राहणार, असेही यत्नाळ म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष संघटनेतील वादांमध्ये लक्ष घातले नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर यत्नाळ म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या पक्षसंघटनेत काय चालले आहे, याची त्यांना कल्पना असण्याची शक्यता कमीच आहे.

बसनगौडा पाटील यत्नाळ पुढे म्हणाले की, मी कधीही माझ्या पक्षावर टीका केली नाही. पक्ष मला माझ्या आईसारखा आहे. पक्षाला जेव्हा मी चांगला नेता असल्याचा विश्वास पटेल, तेव्हा ते मला नक्की परत घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस किंवा जेडीएसमध्ये जाणार नाही

दरम्यान बसनगौडा पाटील हे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का? याबद्दलच्या शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या. आपण काँग्रेस किंवा जेडीएस पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, भाजपाने त्यांना पुन्हा पक्षात घेतले नाही तर ते विजयादशमीला मोठा निर्णय घेतील, असेही त्यांनी जाहिर केले.

यत्नाळ यांच्यावरील कारवाई सुनियोजित

राजकीय विश्लेषकांच्या मते यत्नाळ यांच्यावर पक्षाने केलेली कारवाई हा सुनियोजित रणनीतीचा भाग आहे. दक्षिणेत केवळ कर्नाटक राज्यात भाजपाची ताकद टिकून आहे. त्यामुळे संघटनेला छेद देणारी विधाने करणाऱ्या नेत्यांवर जरब बसविण्यासाठी पक्षाकडून यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक हे राज्य दक्षिणेत शिरकाव करण्याचे प्रवेशद्वार असल्याचे भाजपाचे मानने आहे. या राज्यात येडियुरप्पा यांनी कित्येक वर्षांपासून भाजपाची पकड टिकवून ठेवली आहे. तसेच तमिळनाडू आणि केरळ सारख्या राज्यात पक्ष वाढविण्याचाही येडियुरप्पा प्रयत्न करत आहेत.

राजकीय जाणकार सांगतात त्याप्रमाणे भाजपाने राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, छत्तीसगडमध्ये रमण सिंह, मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान अशा अनेक प्रादेशिक नेत्यांना बाजूला केले आहे. परंतु कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांना मात्र वेगळी वागणूक दिली जाते.

यत्नाळ यांची हकालपट्टी झाल्यानंतर काही तासांतच येडियुरप्पांचे सुपुत्र आणि शिवमोग्गाचे खासदार बीवाय राघवेंद्र आणि विजयेंद्र यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. तसेच या भेटीचे फोटो एक्सवर शेअर केले. यावरूनच येडियुरप्पा यांना भाजपाश्रेष्ठी विशेष वागणूक देत असल्याचे दिसून आले.