Yogi Adityanath : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पद तिथे घडलेल्या अनागोंदीमुळे सोडावं लागलं. ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ही घटना घडली. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी एक नारा दिला. हा नारा चांगलाच चर्चेत आला आहे. हा नारा आहे बटेंगे तो कटेंगेचा! विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतही हा नारा चर्चेत आला आहे.
बटेंगे तो कटेंगेचा अर्थ नेमका काय?
बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचा अर्थ लक्षात घेतला तर योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) हे सांगू इच्छितात की आपली एकता हीच आपली शक्ती आहे. जर आपण एकसंध राहिलो नाही तर वाटले गेलो तर अपयशी ठरू. देश एकसंध राहिला पाहिजे. आपल्या परंपरा, आपली संस्कृती एक असली पाहिजे. बटेंगे तो कटेंगे असं म्हणत योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी आग्रा या ठिकाणी हे भाषण केलं होतं. या भाषणात हा नारा पहिल्यांदा दिला गेला.
योगी आदित्यनाथ का त्यांच्या भाषणात काय म्हणाले?
बांगलादेशातल्या हिंदूंवर कसे अत्याचार होत आहेत आणि त्यावेळी आपल्या विरोधी पक्षातले लोक कसे मूग गिळून गप्प आहेत हे देखील योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. जगात काही घडलं की विरोधी पक्ष लगेच तावातावाने बोलतो. मात्र बांगलादेशात हिंदूंची मंदिरं तोडली गेली, हिंदूंना मारलं गेलं, त्यांचे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले. याबाबत विरोधक गप्प का बसले आहेत? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला होता. तसंच विरोधक बोलत नाहीत कारण त्यांना त्यांची मुस्लिम व्होट बँक जाईल अशी भीती वाटते आहे असंही योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath )म्हणाले होते.
उत्तर प्रदेशात सप्टेंबर महिन्यात काय घडलं?
सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशात काही घटना अशा समोर आल्या ज्या अन्नातील भेसळीशी संबंधित होत्या. खायच्या वस्तूंमध्ये थुंकी, लघवी मिसळल्याचे हे प्रकार घडले. ज्यानंतर असे प्रकार घडू नयेत म्हणून योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी कठोर निर्देश लागू केले आहेत. तसंच खाद्य व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या दुकानांवर त्यांची नावं स्वच्छ आणि वाचता येतील अशा अक्षरांमध्ये लिहावीत अशीही एक महत्त्वाची सूचना केली. नंतर या अँटी हार्मनी अॅक्टिव्हिटी आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करणारा अध्यादेशही आणला गेला. आम्ही याद्वारे कुठलेही असमाजिक घटक हे त्यांची ओळख लपवू शकणार नाही आणि खाद्य पदार्थ तसंच अन्न पदार्थ यांच्यात लघवी करणे, थुंकणे किंवा इतर काही भेसळ करण्यात करणार नाहीत याची काटेकोरपणे काळजी घेतली जाईल असंही योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) म्हणाले. तसंच ज्या हॉटेल्स किंवा रेस्तराँ या ठिकाणी खाद्यपदार्थ तयार होत आहेत तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भोजन वाढणाऱ्या कामगारांनी स्वयंपाक करताना आणि तो वाढताना डोक्यावरची टोपी, हातमोजे, मास्क वापरणं हे बंधनकार असेल असाही निर्णय घेण्यात आला आहे. कावड यात्रा सुरु असताना ढाब्यांवरही स्वच्छ आणि वाचता येतील अशा अक्षरांत नावं लिहावीत असंही स्पष्ट करण्यात आलं होतं. हे निर्देश दिल्याने योगी आदित्यनाथ भेदभावाचं राजकारण करत आहेत असा आरोप असदुद्दीन ओवैसी आणि समाजावदी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी केला होता.
बटेंगे तो कटेंगे नारा का दिला गेला?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वात मोठा फटका बसला तो उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०१९ ला या जागांपैकी ६२ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. २०२४ ला ही संख्या ३३ वर आली. तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत २०१९ ला महाराष्ट्रात भाजपाला ४२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी ही संख्या १७ इतकी खालावली. या सगळ्या घडामोडींनंतर आता हिंदूंनो एक व्हा हे सांगण्यासाठी बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याचा प्रचार केला. त्यामुळे आता हिंदू एकता हा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावर आहे हे स्पष्ट दिसून येतं आहे.