सांगली : विधानसभेचे रणमैदान जाहीर होण्याअगोदर जिल्ह्यात राजकीय वर्चस्व, श्रेयवाद यातून राजकीय नेते हातघाईवर आले असून यामुळे यंदाचा दिवाळी-दसरा सण आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फोडणारा ठरणार आहे. जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ, जत आणि पलूस-कडेगावमध्ये हा रणसंग्राम अधिक तीव्र असल्याचे संकेत नुकत्याच घडलेल्या आणि घडू पाहणार्या घटनांमुळे मिळत आहेत. गेल्या आठवड्यात कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडीवरून झालेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि भाजप यांच्यात गटातील संघर्ष, सोमवारी तासगावमध्ये आजी-माजी खासदार यांच्यात सभेच्या व्यासपीठावरच झालेली हमरीतुमरी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार पाहिला तर जिल्ह्यातील राजकीय परंपरा कडेलोटाच्या टोकावर असल्याचेच दिसून आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांना पराभूत करून महाविकास आघाडीतून बंडाचे निशाण खांद्यावर घेऊन विशाल पाटील विजयी झाले. या बंडखोरीला काँग्रेसचे उघडउघड समर्थन होते हे एखादे शेंबडं पोरगही सांगू शकेल. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने व्यासपीठावरून आघाडी धर्म पालनाचे कर्तव्य पार पाडत असताना अप्रत्यक्ष भाजपला मदत केली होती. एकेकाळी जिल्ह्यात जेजीपी म्हणजेच जयंत जनता पार्टी अधिक सक्षम बनली ती अंतर्गत गटबाजीच्या राजकारणातून आता मात्र, शत प्रतिशत भाजपच्या वावटळीत आणि राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणात जेजीपी मोडीत निघाली असली तरी जुने स्नेहबंध आजही दिसतात. यातूनच पलूस-कडेगावमध्ये तिसर्या शक्तीला ताकद देण्याचे काम सुरू आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अदृष्य शक्तीचा चक्रव्यूह भेदून आरआर आबा गटाने अपक्षाचे मतदान वाढविण्यात हातभर तर लावलाच पण माजी खासदार पाटील यांना बालेकिल्ल्यात कमी मतदान झाले. यातून हा राजकीय संघर्ष तीव्र स्वरुपात पुढे येत आहे.
हेही वाचा – पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’
कवठेमहांकाळ नगरपंचायत तशी अजून बाल्यावस्थेत आहे. या नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आणि आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले. पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. मात्र,२४ तास उलटण्यापूर्वीच फिर्यादी असलेल्या मुल्ला यांनी गैरसमजातून तक्रार केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करत तक्रार मागे घेतली. यावेळी खासदार पाटील यांनीही माजी खासदारांवर टीका केली. यानंतर आठ दिवस उलटण्यापूर्वीच पुन्हा तासगाव नगरपालिका इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पाटील यांनी तासगावच्या बाह्यवळण रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्यामुळे १३७ कोटी मंजूर करण्याची घोषणा विटा येथे केली. याचेच भांडवल करण्याचा प्रयत्न खासदारांनी माजी खासदारांच्या समोर केला. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या साक्षीने याला माजी खसदारांनी आक्षेप घेतला. यावर खासदारांनीही त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांमध्ये हातवारे करून वाद झाला. काही कार्यकर्ते खासदारांच्या आसनाकडे धावले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला अन्यथा, तासगावच्या इतिहासात वेगळाच प्रसंग चित्रित झाला असता.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या विस्तारित योजनेतून कडेगाव तालुक्यातील अपशिंगेसारख्या पाच सहा गावांनाही लाभ मिळणार आहे. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी फलकातून केला. याला प्रत्युत्तर म्हणून उपरोधिक फलक लावून काम कोणाचे, श्रेय कोण घेतय असा फलक जवळच लावण्यात आला. आता फलक युद्ध सुरू असले तरी येणारी निवडणुक सोपी नाही हेच यातून जाणवत आहे.
हेही वाचा – मावळतीचे मोजमाप: शिक्षण; प्रश्नांच्या संख्येत घट, समस्या कायम
जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना आमदारकीच वेध लागले आहेत. मात्र, स्वत:चा आटपाडी मतदारसंघ सोडून जतमध्ये कशासाठी असा सवाल करत भूमीपूत्रालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह तमणगोंडा रविपाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बूथ समितीच्या बैठकीत पक्ष निरीक्षकासमोर धरला. यातून भाजप अंतर्गत असलेल्या गटात हाणामारीही झाली. हा संघर्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकदा का ही संधी गेली तर पुढची पाच वर्षे गप्प बसावे लागणार आहे. यातून स्थानिक विरुद्ध उपरा हा संघर्ष अधिक टोकालाही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अधिक तीव्र स्वरुपाचा असेल याची ही चुणूक म्हणावी लागेल.