महेश सरलष्कर

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन २८ दिवसानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐनवेळी पूर्वनियोजित दिल्ली दौरा बुधवारी रद्द केल्यामुळे शिंदे-भाजप युती सरकारच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे दिसू लागले आहे.

राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे मुख्यमंत्री शिंदे सांगत असले तरी, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने हिरवा कंदिल दिल्याशिवाय अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास दिल्लीला येणार होते. त्याची सूचना दिल्लीत संबंधितांना देण्यात आली होती. शिंदेचे आगमन होणार असल्याने संबंधितांकडून तयारीही करण्यात आली होती. दिल्लीत आल्यावर शिंदे भाजपच्या नेतृत्वाची भेट घेण्याचीही शक्यता होती. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याचे कळवण्यात आले.

हेही वाचा… बंडखोरांना बळ देण्यावर शिंदे गटाचा भर, मुख्यमंत्री शनिवारी मालेगाव दौऱ्यावर

शिंदे दिल्लीला येत असल्याचे बुधवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आले होते. शिंदे व फडणवीस हे दोघे दिल्लीला येणार असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, शिंदे हे एकटे दिल्लीला येणार असून फडणवीस यांचा या दौऱ्यात समावेश नसल्याचे नंतर सांगण्यात आले. त्यानंतर अचानक शिंदे यांनीही दिल्लीदौरा रद्द केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदिल अद्याप दिलेला नाही, असे सांगितले जात आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील किती आणि कोणत्या सदस्यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार याचा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेणार असले तरी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाची संभाव्य यादी नजरेखालून घालणार आहे. त्यानंतर खातेवाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने मंत्र्यांची यादी तयार केली तर, शिंदेच्या दिल्ली दौऱ्यात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकेल. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांची भेट लांबणीवर टाकल्याने शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा… पिंपरी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात व तेलंगणा या दोन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. शिवाय, १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याचा शिवसेनेचा अर्ज, लोकसभेतील गटनेता बदलण्याला लोकसभाध्यक्षांनी दिलेल्या मंजुरीविरोधातील अर्ज अशा विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कदाचित शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य-बाण’ यावर कोणाचा अधिकार यासंदर्भातही दिशा स्पष्ट होऊ शकेल. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मुद्द्यांचाही विचार भाजपचे केंद्रातील नेतृत्व करत आहे. त्यामुळे शिंदे यांची बुधवारी होणारी भेट एखाद-दोन दिवस पुढे ढकलली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader