मोहनीराज लहाडे
नगरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्याने शरद पवार यांना साथ दिली आहे. अलीकडच्या काळात तर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनत चालला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत १२ पैकी ६ मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडात त्यातील निम्म्या म्हणजे ३ आमदारांनी शरद पवारांची निष्ठा सोडली. जिल्हा सहकार चळवळीचा मानला जातो. येथील राजकारणावर सहकार चळवळीचे प्राबल्य आहे. त्यानुसारच येथील समीकरणे जुळतात. शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये सहकारी संस्थेवर प्राबल्य असलेला कोणी आमदार नाही. त्यामुळेच निम्या आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली तरी जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणावर त्याचा फारसा परिणाम होईल असे दिसत नाही. झालीच तर उलट भाजपची आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचीच अधिक कोंडी होणार आहे.
नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांना साथ दिली आहे. आणखी एक आमदार अशुतोष काळे परदेशात असल्याने त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. ते व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी असलेले थेट नातेसंबंध लक्षात घेता ते काय भूमिका घेणार याबद्दल फारशी चर्चा होत नाही. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे तर शरद पवार यांचे नातू आहेत.
नगर शहरातील आमदार जगताप व भाजप कार्यकर्त्यांमधील संघर्ष परंपरागत आहे. त्यादृष्टीने शहरातील मतदारांचे ध्रुवीकरण भाजपने घडवले आहे. आता जगताप यांनी सत्तेला पाठिंबा दिल्याने भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्याविरुद्ध संघर्ष करताना अडचणी व मर्यादा जाणवणार आहेत. त्याचवेळी आमदार जगताप व खासदार सुजय विखे यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. त्यातून दोन्ही बाजू सांभाळण्याची राजकीय कसरत विखे यांना करावी लागणार आहे. पारनेरचे आमदार लंके हे तर राष्ट्रवादीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार होते. विखे व लंके यांच्यातील वैमनस्य पराकोटीला पोहोचले होते. अशा परिस्थितीत आता विखे व लंके एकमेकांशी कसे जुळून घेतात, हे पाहणे औत्सुक्याचा विषय होणार आहे. भाजप कार्यकर्ते व विखे समर्थक यांचीही कोंडी होणार आहे. अकोल्याचे आमदार लहामटे पूर्वी भाजपमध्येच होते. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख होती. पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लहामटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले. मोठ्या मताधिक्याने त्यांनी पिचड यांचा पराभव केला. त्यासाठी अजित पवार यांनीच लहामटे यांना पिचड यांच्या विरोधात मदत केली होती. आता लहामटे हे अजित पवार यांच्यासमवेत गेल्याने पिचड कोणती भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पिचड यांच्या ताब्यातील साखर कारखानाही लहामटे यांनी हिरावून घेतला. त्यामुळे आता कारखान्याच्या मदतीसाठी लहामटे यांना केंद्र व राज्य सरकारवर अवलंबून राहावे लागणार आहे.
हेही वाचा… कोल्हापूरात सहकारात राजकीय फेरमांडणी होणार
जिल्ह्याच्या सहकाराच्या निवडणुकीत सातत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी यांची विखे यांच्याविरोधात समीकरणे जुळली. आता विखे यांच्या विरोधात लढा देण्यासाठी थोरात यांना नवी समीकरणे जुळवणे भाग पडणार आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या कुकडी व घोड धरणातील नगर जिल्ह्याचा हक्काच्या पाण्याचा प्रश्न विखे यांनी उपस्थित करत अजित पवार यांच्याशी संघर्ष करण्याची भूमिका घेतली. ही भूमिका त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सहानुभूती निर्माण करण्यासाठी उपयोगी पडली. आता अजित पवार व वळसे पाटील सत्तेत सहभागी झाल्याने विखे पितापुत्र जिल्ह्याचा हक्काचा पाण्याचा लढा कसा रेटणार याकडेही लक्ष राहणार आहे.
हेही वाचा… सांगलीत जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम राहणार ?
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते थोरात यांनी पुढाकार घेत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघात निधी वितरणात पालकमंत्री विखे यांच्याकडून दुजाभाव दाखवला जातो असा आरोप केला. त्यावेळी थोरात यांच्या भूमिकेला समर्थन देण्यात आमदार लंके व आमदार लहामटे यांचा समावेश होता. या दोघांनी अजित पवार यांना साथ देण्यामध्ये ही परिस्थितीही काहीशी कारणीभूत ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.