छत्रपती संभाजीनगर – बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यात आष्टी मार्गे होणाऱ्या आगमनाप्रसंगी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचे ‘पालक’त्व यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी एक बैठक घेतली. महायुतीचा उमेदवार ठरून आणि प्रचाराची दिशा निश्चित झालेली असताना महाविकास आघाडीत मात्र, जागा कोणाला सोडायची, याविषयीचा तिढा सुटलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीडमध्ये मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवलेले अजित पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले गेलेले बजरंग सोनवणे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. सोनवणे यांनी अजित पवार यांच्या पक्षाची साथ सोडणे हा धनंजय मुंडे यांना धक्का मानला जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी मावळत्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात ५ लाख ९ हजार ८०७ मते घेतली होती आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही सिंहाचा वाटा होता. मुळात सोनवणे यांना उमेदवारी देण्यामागे धनंजय मुंडे यांचाच आग्रह अधिक मानला गेला होता. दोघांचीही लढत विरोधातील भाजप उमेदवाराशी होती. आता राज्य पातळीवरील राजकीय संदर्भ बदलले आहेत. धनंजय मुंडे ज्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तो पक्ष भाजपचा मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहे.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

पालकमंत्रीपदाची जबाबदारीही धनंजय मुंडे यांच्यावर आहे. भाजपमधील नाराज नेत्या म्हणून कायम चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीचे मन तयार करण्यातही धनंजय मुंडे यांचे कसब पणाला लागल्याची चर्चा सुरू असते. त्यामागे पंकजा यांच्या विजयासाठी प्रचाराची जबाबदारी हा एक भाग असून महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिला तर गठ्ठा मतदान फोडण्याचा अनुभव धनंजय मुंडे यांना त्यांच्या परळीतील विजयातून गाठिशी आलेला आहे.

हेही वाचा – मी १०० टक्के निवडणुकीच्या रिंगणात, ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत – वसंत मोरे

परळीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासंवाद बैठकही चर्चेत असून बैठकीला परळी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी सकल मराठा समाज बैठकीसाठी आग्रही होता. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांच्याविषयी जिल्ह्यातील काही नेत्यांमध्ये नाराजी असली तरी महायुतीचा धर्म म्हणून इतर ठिकाणचे नेते पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी काम करतील, असा अंदाज बांधला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed lok sabha constituency pankaja munde pankaja munde campaign responsibility by dhananjay munde print politics news ssb