छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघात ओबीसी ध्रुवीकरणाच्या भाजपच्या प्रयोगाला ‘मराठा’ ध्रुवीकरणातून उत्तर शोधण्यासाठी बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या उमेदवारीची चाचपणी केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडे यांची सोबत असताना राजकीय पटलावर ‘वजन’ असणारे बजरंग सोनवणे हे सध्या दोन साखर कारखाने चालवितात. जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेल्या सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख ९ हजार ८०७ मते मिळविली होती. त्यांनी नुकतेच शरद पवार यांचे नेतृत्त्व स्वीकारले आहे. त्याच वेळी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणारे दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकगठ्ठा झालेला मराठा प्रस्थापित मराठा नेत्यांनाही मोजायला तयार नसल्याने बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

बीड राजकारणावर मुंडे परिवाराचा वरचष्मा, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा, पक्षांतर्गत संघर्ष करणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यात आता धनंजय मुंडे यांची भर पडली असल्याने अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी इच्छुक नेते अस्वस्थ असतात. पक्षीय भूमिकेपेक्षाही आपले राजकीय अस्तित्व कायम राहावे म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर माजलगावचे आमदार प्रकाश साेळंके यांनी जोरदार हल्ला चढविला होता. धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील सुप्त संघर्ष बीडच्या राजकारणात नेहमी चर्चेत असतो. बाळासाहेब आसबे ही आमदार मंडळी महायुती धर्म कसा सांभाळतील यावरही बरीच गणिते ठरणार आहेत. त्यामुळे मराठा ध्रुवीकरणात बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे यांचा प्रयोग केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – पंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे

बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे समर्थक. मूळ केज तालुक्यात त्यांचे गाव. याच तालुक्यात येडेश्वरी नावाचा साखर कारखाना ते चालवतात. केज तालुक्यातील चिंचोली माळी या जिल्हा परिषदेच्या गटातून बाबाराव आडसकर यांच्या तिसऱ्या पिढीतील ऋषिकेश आडसकर यांना पराभूत करून ते निवडून आले. तसेच रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना आणि बजरंग सोनवणे यांच्या पत्नी रसिका यांची लढत युसूफ वडगाव गटात झाली, त्यातही सोनवणे यांच्या पत्नी निवडून आल्या. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आघाडीवर असणारे बजरंग सोनवणे यांनी पक्षांतर्ग फुटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले. यांना आता लोकसभा निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. पूर्वीही त्यांनी निवडणूक लढविली होती. मात्र, तेव्हा मिळालेले अपयश आता यशामध्ये परावर्तीत करता येईल का, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याला आधार आहे तो आरक्षण मागणीमुळे निर्माण झालेल्या ध्रुवीकरणचा. हाच आधार ज्योती मेटे यांनाही असणार आहे. त्यांना उमेदवारी दिली तर दोन महिलांमध्ये लढत होऊ शकेल.

हेही वाचा – मी १०० टक्के निवडणुकीच्या रिंगणात, ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत – वसंत मोरे

दिवंगत विनायक मेटे आणि पंकजा मुंडे भाजपमध्ये एकत्रित काम करत असतानाही जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्यातील मतभेद सर्व परिचित होते. मेटे यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली तरी पंकजा मुंडे गैरहजर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मुंडे विरुद्ध मेटे असा राजकीय लढा उभारता येईल का, याची चाचपणी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे.

ओबीसी एकत्रिकरणाच्या प्रयोगाला आता ‘महायुती’मुळे अधिक साथ मिळेल, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. तर स्थानिक वर्चस्वासाठी काही मराठा नेते फारसे सक्रिय राहतील का, याविषयी आतापासून शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात सोनवणे आणि मेटे यांच्या उमेदवारीतून मराठा ध्रुवीकरणाचा प्रयोग शरद पवार गटाकडून केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येते आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed lok sabha constituency sharad pawar sharad pawar experiment of maratha polarization in beed print politics news ssb