छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघात मराठा- ओबीसी आरक्षणाभोवतीच प्रचाराची छुपी चर्चा होत आहे. शेतकरी आत्महत्या, चारा-पाणी टंचाई हे सर्वसामान्यांना भेडसावणारे मुद्दे प्रचाराबाहेर असून रेल्वेचा मुद्दा अधून-मधून केंद्रस्थानी आणला जात असल्याचे चित्र आहे. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात खरी थेट लढत होत असून त्याला ओबीसीविरुद्ध मराठा, असा जातीय रंग चढवण्यात येत आहे. त्यात यशवंत गायके हे ओबीसी बहुजन पक्षाचे तर अशोक हिंगे हे वंचितचे उमेदवार आहेत. हिंगे मराठा तर गायके ओबीसी असल्याने पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांना मतविभाजनाचा कितपत फटका बसतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच, परंतु निवडणुकीत आरक्षणच प्रचारातला छुपा चर्चेतला मुद्दा आहे. विशेषत: ग्रामीण भागात. तर मेळावे, जाहीर सभांमधून विकासाचे स्वप्न दाखवले जात आहे. पण नेमका विकास काय हे थेट सांगितले जात नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतच्या प्रारुपा भोवती चर्चा झडवली जात आहे. पंकजा मुंडे या त्यांच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्रीपदाच्या कार्यकाळात दिलेल्या विकास निधीवर बोलत आहेत. तर बजरंग सोनवणे हे रेल्वेचा मुद्दा व ‘मी शेतकरी पुत्र’ म्हणूनच प्रचार करत आहेत. महायुती व महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या-त्यांच्या प्रभावक्षेत्रात प्रचारात असले तरी परस्परांवर कुरघोडी करून अस्तित्व कसे सिद्ध करता येईल, याच्या गोळाबेरजेतच ते गुरफटल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यात सध्या चारा-पाणी टंचाईचे भीषण स्वरुप आहे. माजलगाव धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यात मागील तीन महिन्यात २१५ च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्यात सर्वाधिक बीडमध्ये आहेत. बीडमधील शेतकरी आत्महत्यांची संख्या ४५ पर्यंत पोहोचली आहे. मागील तीन महिन्यातील ही संख्या आहे. त्याला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याची जोड चिटकत आहे. बीड जिल्ह्यात प्रत्येक दुष्काळात चारा छावण्या उभारल्या जातात. राजकीय पुढाऱ्यांसाठी कुरण म्हणून चारा छावण्यांकडे पाहिले जाते. मार्च-एप्रिल महिन्यापासूनच चारा छावण्यांची तयारी सुरू झालेली असते. यावेळी चारा छावण्यांचाही मुद्दा कुठेही चर्चेत आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानेही सर्वाधिक नुकसान हे बीड जिल्ह्यात असून ९७ गावांमधील सुमारे एक हजार २० पेक्षा अधिक हेक्टरवरील शेतीक्षेत्र बाधित झाले आहे.
हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
मनोज जरांगे यांचा दौरा
बीडमधील पाटोदा तालुक्यात मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाले. सोनेगाव येथे त्यांची पेढेतुला करण्यात आली. तर इतर गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे यांच्या दौऱ्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, गावपातळीवर नेत्यांना खडेबोल सुनावण्यासाठी मराठा समाजातील तरुणांना बळ मिळाले आहे. स्थानिक महायुतीतील मराठा नेत्यांची पंचाईतही झाली आहे. तर धनंजय मुंडे यांनी मराठा समाजातील तरुणांची यापूूर्वी बोलावलेल्या बैठकीला अल्प प्रतिसाद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा जिल्ह्याबाहेर सोमवारी बैठक घेतल्याचीही चर्चा रंगली आहे.