छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यातील लढतीला मराठा विरुद्ध ओबीसीसोबतच राजकारणतला वडील, मामापासून लाभलेला समृद्ध वारसा ते शेतकरी – त्यातही कुणबी पुत्र असाही रंग देण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.
बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी गेवराईत नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तथा राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकरी पुत्र उमेदवार रिंगणात असल्याचे ठरवण्यात आले. प्रचारात हाही मुद्दा केंद्रस्थानी ठेवून शेतकरी पुत्र म्हणजे कुणबी आणि कुणबी हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागील अन्वयार्थ पाहिला तर तो मराठा या जातविषयक शब्दाभोवती फिरणारा आहे. या बैठकीला माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार उषा दराडे यांच्यासह महाआघाडीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा- काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
पंकजा या “राज” कन्या घराण्यातून आलेल्या आहेत. त्यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे हे राज्याचे विरोधी पक्षनेते ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जामंत्री, दोनवेळा खासदार, अल्पकाळ केंद्रात ग्रामविकास मंत्री, तर मामा प्रमोद महाजन हे केंद्रीय स्तरावरील राजकारणातले बडे प्रस्थ होते. आताही पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन हे मनसेचे नेते आहेत आणि तेही परवा पंकजा यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहिले होते. शिवाय पंकजा मुंडे यांना भाजपमधील राजकारणात बाजूला ठेवून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असताना प्रकाश महाजन यांनी पंकजा यांची बाजू घेत आक्रमकपणे भाजपवर टीका केली होती. स्वतः पंकजा मुंडे यांनी राज्यात महिला व बालविकास व ग्रामविकास मंत्री म्हणून कामकाज पाच वर्षे सांभाळले आहे. असा राजकीय समृद्ध वारसा लाभूनही पंकजा मुंडे यांना वडिलोपार्जित वैद्यनाथ साखर कारखाना चालवता आला नाही. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नसून १० लाख रुपयांची लाच घेताना वैद्यनाथ बँकेच्या माजी अध्यक्षांना पकडण्यात आल्यामुळे सहकार क्षेत्र चालवण्यात त्यांचे नेतृत्व कमी पडल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कुणबी, शेतकरी पुत्र, यशस्वीपणे दोन साखर कारखाने चालवणारे बजरंग सोनवणे हे कुठलाही राजकीय वारसा नसलेले शेतकरी, सर्व सामान्यांना जवळचे वाटावे, असे उमेदवार असल्याचा प्रचार केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू आहे.
हेही वाचा – नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
पारंपरिक लढ्यातील मतांची टक्केवारी कशी होती ?
२०१९ मध्ये डाॅ. प्रीतम मुंडे यांना ५०.११ टक्के मतदान मिळाले होते तर बजरंग सोनवणे यांना ३७.६७ टक्के मते मिळाली होती. तत्पूर्वी म्हणजे २०१४ मध्ये त्यांच्या मताची टक्केवारी ७०.२४ टक्के एवढी होती. २००४ मधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता १९९६ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तर २००४ मध्ये जयसिंग गायकवाड पाटील या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. १९७७ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गंगाधर अप्पा बुरांडे निवडणून आले होते. १९८९ मध्ये जनता दलाकडून बबनराव ढाकणे हेही बीडचे खासदार होते. पुढे मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ बांधला. या मतदारसंघाचे केशरकाकू क्षीरसागर यांनी दोनदा नेतृत्व केले.