Dhananjay Munde Resignation Demand : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात असून त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. त्याचबरोबर पोलीस चौकशीतील कथित अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दरम्यान, या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात ६ आरोपी अटकेत
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संतोष देशमुख हत्याप्रकरण पहिली मोठी अग्निपरीक्षा आहे. आरोपी वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करण्यासाठी २० दिवस का लागले, हत्याप्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार का आहे, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावर बारकाईने लक्ष ठेवलं आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपाचे आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या नेत्यांमध्ये सुरेश धस यांचाही समावेश होता. दरम्यान, भाजपाचे दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सारंगी महाजन यांचे मुंडेंवर गंभीर आरोप
“परळीत प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या नावे करण्यात आली होती. या जमिनीची किंमत साडेतीन कोटी रुपये इतकी होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी माझ्याकडून ही जमीन जबरदस्तीने २१ लाख रुपयांना विकत घेतली”, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. इतकंच नाही तर, मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच सर्व व्यवहारांमध्ये भूमिका बजावली होती, असा आरोपही सारंगी महाजन यांनी केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी सारंगी महाजन यांचे आरोप फेटाळून लावले असून हा व्यवहार करणारी मुंडे आडनावाची व्यक्ती वेगळी असून त्यांनी सर्व व्यवहार नियमाने केले आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांनी फेटाळले आरोप
दुसरीकडे, मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधताना आपण राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, वाल्मिक कराड याच्याबरोबरचे संबंध धनंजय मुंडे यांनी नाकारले नाहीत. परंतु, या गुन्ह्यात आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले असून राजीनाम्याची मागणी जोरकसपणे लावून धरत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल. त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीची सुटका होणार नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आम्ही घटनेच्या मुळापर्यंत जाणार”, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
अजित पवार आणि अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा झाली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीत अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुती सरकारमध्ये मित्रपक्षांचे मत विचारात घ्यावे लागते. परंतु, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात ठोस पुरावे असतील, तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असं भाजपाच्या एका सूत्राने सांगितले.
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का?
महाराष्ट्रातील एका वरिष्ठ भाजपा पदाधिकाऱ्याने सांगितले की, “धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर महायुती सरकारला पहिला मोठा धक्का बसेल. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय महायुतीकडून मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही. जर पुरावे सापडले तर मात्र त्यांना (धनंजय मुंडे) राजीनामा द्यावा लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत वाट बघितली जाईल”, असेही या नेत्याने सांगितले.
भाजपा नेत्यांना वाटतेय या गोष्टीची भीती
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाढू शकतो, अशी भीती भाजपा नेत्यांना वाटत आहे. कारण, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे धनंजय मुंडे यांचे समर्थन करण्यासाठी पुढे आले आहेत. याआधीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही जरांगे आणि हाके यांनी एकमेकांवर जहरी टीका केल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण झाला होता.
मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू. या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आमचे आंदोलन आणखीच तीव्र करू.” दुसरीकडे, लक्ष्मण हाके यांनी देखील या हत्याप्रकरणाचा निषेध करत मनोज जरांगे यांना थेट इशारा दिला आहे. “अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन कोणीही करणार नाही. मात्र, त्यावरून राजकारण करणं अतिशय चुकीचं आहे. जर एखाद्या लोकप्रतिनिधीला (धनंजय मुंडे) चुकीच्या पद्धतीनं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला, तर आम्ही ते सहन करणार नाही”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.