गडचिरोली : महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू केली असतानाच, भाजप व काँग्रेस पक्षाने गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांसाठी आग्रह धरल्याने उत्सुक उमेदवारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी मित्रपक्षच एकमेकांवर कुरघोड्या करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान मोठ्या फरकाने विजयी झाल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते हवेत असून ते तीनही विधानसभा काबीज करण्याचे स्वप्न रंगवीत आहेत. परंतु काही जागांवर मित्रपक्षांच्या दावेदारीने काँग्रेसचा स्वप्नभंग होऊ शकतो. दुसरीकडे, या पराभवामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. याचा वाचपा काढण्यासाठी भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, त्यांच्यापुढेही मित्रपक्षांचा अडथळा असल्याने सध्या जिल्ह्यात उमेदवारी कोणाला मिळणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा… कारण राजकारण : घटत्या मताधिक्याची भरत गोगावलेंना चिंता

गडचिरोली जिल्ह्यात आपल्या वक्त्यव्यांनी वादग्रस्त ठरलेले भाजपचे डॉ. देवराव होळी, आरमोरी येथे भाजपचे कृष्णा गजबे आणि अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) धर्मरावबाबा आत्राम आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून जागावाटपाचे हेच गणित कायम राहू शकते. यातील अहेरी विधानसभेत मात्र भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यामुळे पेच निर्माण झाला आहे. ते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे आहेत. दोघांतील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मधल्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे धर्मरावबाबा महायुतीत आले. आता महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गडचिरोली विधानसभेत विद्यमान आमदार डॉ. होळी यांच्यापुढे पक्षांतर्गत इच्छुकांचे मोठे आव्हान आहे. आरमोरीत मात्र सध्यातरी विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्या व्यतिरिक्त भाजपकडून दुसरा चेहरा पुढे आलेला नाही. परंतु लोकसभेत या क्षेत्रातून काँग्रेसला मिळालेले मोठे मताधिक्य गजबेंना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे याठिकाणी भाजपकडून धक्कातंत्राचा वापर केला जाईल, असे बोलले जाते.

हे ही वाचा… पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द

काँग्रेसमध्ये इच्छुकांची रांग

लोकसभेतील विजयाने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुकांची रांग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरमोरी आणि गडचिरोली यावर काँग्रेसचा पारंपरिक दावा राहिलेला आहे. मात्र, यावेळी अहेरी विधानसभेसाठीही काँग्रेस आग्रही असल्याचे दिसते. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षदेखील अहेरीसाठी उत्सुक आहे. त्यामुळे जागावाटपात सर्व राजकीय पक्षांचा कस लागणार, एवढे निश्चित.