जनता दल (युनायटेड) पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये राज्यसभेचे उपसभापती आणि खासदार हरिवंश नारायण सिंह यांना सामील करून घेतले नाही. भाजपाशी त्यांची असलेली जवळीक यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. मागच्या आठवड्यात जेडी (यू) पक्षाने ९८ सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी गठीत केली. या समितीमध्ये राज्यातील सर्व मंत्री, लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांचा समावेश आहे. फक्त हरिवंश यांना यातून वगळण्यात आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडी (यू) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांनी मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भाजपाशी काडीमोड घेऊन महागठबंधन आघाडीतील लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन केली. तेव्हाच हरिवंश सिंह यांना राज्यसभेचे उपसभापतीपद सोडण्यासाठी सांगितले होते. मात्र, पदावरून बाजूला होण्यास हरिवंश यांनी साफ नकार दिला. तेव्हापासून पक्षाचे आणि हरिवंश यांचे संबंध ताणले गेले आहेत. या संबंधात आणखी तणाव निर्माण झाला, जेव्हा २८ मे रोजी नव्या संसद भवनाच्या उदघाटनासाठी हरिवंश सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थित राहिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्य संसद भवनाचे उदघाटन करण्यासाठी निमंत्रित न केल्यामुळे जेडी (यू) आणि इतर विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.
हे वाचा >> नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करणार? चर्चेला उधाण; जाणून घ्या बिहारमध्ये काय घडतंय?
जेडी (यू) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांनी नुकतीच हरिवंश यांच्यावर खोचक टीका केली. माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ते म्हणाले की, तुम्ही (पत्रकारांनी) त्यांना एकता विचारा, ते जेडीयूचा भाग आहेत की नाही? हरिवंश सिंह यांनी मात्र राष्ट्रीय अध्यक्षांच्या टिप्पणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, नव्या संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी त्यांचे संवैधानिक कर्तव्य पार पाडले. हरिवंश यांच्या निकटवर्तीय सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, २०१९ साली जेव्हा नव्या संसद भवनाचे भूमिपूजन झाले होते, तेव्हादेखील हरिवंश सिंह उपस्थित होते. पण, त्यावेळी जेडी (यू) हा एनडीएचा घटकपक्ष होता.
हरिवंश सिंह यांचे कथित बंड हे जेडी (यू) मध्ये नवीन नाही. २००५ साली जेव्हा नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून अनेकांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. मागच्या १७ वर्षांत पक्षाने ज्यांना राज्यसभेत पाठविले होते, त्यापैकी हरिवंश सिंह यांच्यासह आतापर्यंत १२ ज्येष्ठ नेत्यांनी एकतर पक्षातून काढता पाय घेतला आहे किंवा पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, एनडीएचे माजी संयोजक दिवंगत शरद यादव, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, वित्तीय आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह आणि वरिष्ठ नेते शिवानंद तिवारी यांचा या यादीत समावेश आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जॉर्ज फर्नांडिस यांची प्रकृती खालावल्यामुळे पक्षाने तिकीट नाकारले होते. तेव्हा फर्नांडिज जेडी (यू) पक्षातून बाहेर पडले. त्यांनी मुझफ्फरपूरमधून अपक्ष निवडणूक लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर जेडी (यू) पक्षाने फर्नांडिज यांची मनधरणी करून त्यांना राज्यसभेवर घेतले.
शरद यादव हे बराच काळ जेडी (यू) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते. २०१७ साली नितीश कुमार यांनी महागठबंधनशी संबंध तोडून पुन्हा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर शरद यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरविण्यात आले होते. उपेंद्र कुशवाह हे एकेकाळी नितीश यांचे खंदे समर्थक होते. पक्षाने त्यांना २०१० साली राज्यसभेवर पाठविले. मात्र, २०१३ रोजी नितीश कुमार यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन ‘राष्ट्रीय लोक समता पार्टी’ हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. २०२१ साली ते पुन्हा जेडी (यू) मध्ये परतले होते. पण, याच वर्षी अचानक त्यांनी पुन्हा पक्षातून बाहेर पडत स्वतःच्या पक्षाचे काम पुन्हा सुरू केले.
आणखी वाचा >> ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुखपदासाठी रस्सीखेच; लालू प्रसाद यादव यांच्या गुगलीमुळे नितीश कुमार गट अस्वस्थ
एन. के. सिंह आणि शिवानंद तिवारी यांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुन्हा वर्णी न लावल्यामुळे नाराज होऊन दोन्ही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नितीश कुमार यांनी दोन्ही नेत्यांना २०१४ च्या लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. तिवारी यांनी त्यानंतर आरजेडी पक्षात प्रवेश केला, ते सध्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. एन. के. सिंह यांनी २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला, ते सध्या १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत.
दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले अली अन्वर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मुस्लिम समाजातील महत्त्वाचा नेता मानल्या जाणाऱ्या अन्वर यांनी २०१७ साली जेडी (यू) ने पुन्हा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.