सध्या निवडणुकांच्या प्रचाराला सुरवात होण्याआधी सोशल मीडियावर मिम्स आणि मॉर्फ व्हिडीओज वायरल व्हायला सुरुवात होते. यामध्ये पक्षावर, नेत्यांवर मिम्सच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून उपहासात्मक टीका केली जाते.अर्थात, हे व्हिडिओ,मिम्स बनवणाऱ्याचे नाव त्यावर नसते. त्यामुळेच सोशल मीडियावर हे व्हिडीओ बनवणारे सायलेंट प्रचारक म्हणून काम करतात. 

मध्य प्रदेशात सध्या अश्याच एका व्हीडिओने धुमाकूळ घातला आहे. हा मॉर्फ केलेला व्हिडिओ पौराणिक असून राम आणि रावण यांच्यातील युद्धचा दाखला देण्यात आलेला आहे. रामाच्या भूमिकेत कमलनाथ असून रावणच्या भूमिकेत शिवराजसिंग चौहान यांना दाखवण्यात आले आहे. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ रामायणातील युद्धाच्या क्लायमॅक्सचा आहे. 

व्हिडिओत नक्की काय दाखवण्यात आले आहे? 

या व्हिडिओत रामच्या भूमिकेत असलेले कमलनाथ आपल्या भात्यातून एकामागून एक बाण काढतात आणि चौहान यांना रावण म्हणून संबोधतात. शिवराजसिंग चौहान यांना दहा डोकी दाखवण्यात आली आहेत. प्रत्येक डोक्यावर शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी अशी नावे लिहिण्यात आली आहेत. रावणाची ९ डोकी उडवल्यावर राम असाह्य झालेल्या रावणाकडे बघतो आणि अंतिम असणारे ब्रह्मास्त्र बाहेर काढतो. व्हिडिओत रामाच्या भूमिकेत असणारे कमलनाथ रावणाच्या भूमिकेत दाखवण्यात आलेल्या शिवराजसिंग चौहान यांना म्हणतात ” निर्णय की घडी आयी है” या संदेशासह व्हिडिओ समाप्त होतो आणि खाली एक ओळ येते ” कमलनाथ रिटर्न्स-२०२३”

व्हिडिओ कोणी बनवला?

सध्या प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कोणी बनवला याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.  काँग्रेसने मात्र हा व्हिडिओ पक्षातर्फे बनवण्यात आला नसल्याचं स्पष्ट केले आहे. मध्यप्रदेशमधील तापलेल्या राजकीय वातावरणात काँग्रेस आणि भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. गेल्या महिन्यात कमलनाथ यांना रजनीकांत यांच्या रुपात दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये कमलनाथ महागाई, अत्याचार, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर भाष्य करतात. मध्यप्रदेशला शिवराजसिंग चौहान  यांच्या ‘जंगलराज’ पासून वाचवण्याची गरज असल्याच्या घोषणेने व्हिडिओ संपतो.

भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील हे सोशल मीडिया वॉर २०१८ च्या निवडणुकांच्या वेळी चांगलेच रंगले होते. निवडणुकांच्या आधी अमित शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपाचे पाऊल हे वानर राजा अंगद यांच्यासारखे मजबूत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अंगद यांच्या भूमिकेत शिवराजसिंग चौहान आणि रावणाच्या भूमिकेत कामलनाथ असा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना रावण कुटुंबातील सदस्य म्हणून दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ भाजपाचे आयटी सेल प्रमुख शिवराजसिंग दाबी यांनी त्यांच्या सोशल मीडिया आकाऊंटवर शेअर केला होता. तेव्हा काँग्रेसने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. 

Story img Loader