महेश सरलष्कर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आठवडाभर झालेल्या मॅरेथॉन बैठकांमुळे पक्ष संघटनेतच नव्हे तर, केंद्रीय मंत्रिमंडळातही बदलाचे संकेत मिळू लागले आहेत. दिल्लीमध्ये रविवारी (११ जून) भाजपचे वार्षिक ‘मुख्यमंत्री संमेलन’ होणार असून या बैठकीनंतर पक्षांतर्गत फेरबदलांना सुरुवात होईल. चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका तसेच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

दरवर्षी भाजपच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची चिंतन बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षीही मेमध्ये ही बैठक झाली होती. पक्षाच्या मुख्यालयात रविवारी होणाऱ्या बैठकीला पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यासह राष्ट्रीय सचिव- महासचिव-उपाध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुख्यत्वे संघटनात्मक फेरबदल, केंद्रातील योजनांचा विस्तार आणि लोकसभा निवडणुकीसाठी संपर्क मोहीम व व्यापक धोरणांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदलावरही शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

हेही वाचा… विरोधकांची तयारी पाहता भाजपाने बदलली रणनीती; आता एनडीएतील मित्रपक्षांना एकत्र करण्याची तयारी सुरू

दोन आठवड्यांपूर्वीच २८ मे रोजी मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली होती. मोदींच्या या आढावा बैठकीनंतर नड्डा यांनी एकापाठोपाठ एक बैठका घेऊन विविध प्रदेश भाजप संघटनांमधील फेरबदलांवर मंथन केले. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सलग पाच दिवस नड्डांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांमध्ये प्रामुख्याने नड्डा, शहा आणि संतोष यांनी काही प्रदेश भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी सल्ला-मसलत केली. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुका जिंकणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वसुंधरा राजेंच्या नाराजीमुळे राजस्थान भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यांच्याशी तडजोड केल्याशिवाय यश मिळण्याची शक्यता नसल्याने वसुंधरा राजेंशी दिल्लीमध्ये तिन्ही नेत्यांनी एकत्रित चर्चा केली. राजस्थानमधील निवडणुकीची सूत्रे पुन्हा वसुंधरा राजेंकडे दिली जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चौहान व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्यातील मतभेद तीव्र झाले आहेत. त्यामुळे तिथे प्रदेश भाजप तसेच, राज्य मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्येही बदल केले जातील. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये प्रभारीही बदलले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… विदर्भातील ओबीसी मतांवर सर्वपक्षीयांचा डोळा

केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल?

कर्नाटकमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर, भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून तेलुगु देसमचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बुधवारी चर्चा केली. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीलाही चुचकारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याच प्रमाणे पंजाबमधील सर्वात जुना मित्र पक्ष शिरोमणी अकाली दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. तेलुगु देसम, अकाली दल तसेच, भारतीय राष्ट्र समिती या पक्षांना ‘एनडीए’मध्ये आणले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदे गट- भाजप यांच्यातील मतभेद तीव्र होत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शहांनी चर्चा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एनडीए’ मजबूत करण्याची गरज असल्याने जुन्या-नव्या घटक पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. पक्षांतर्गत बदल तसेच, राज्यांतील मंत्रिमंडळ फेरबदलानंतर पुढील महिन्यात, जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before the reshuffle in the bjp all attention on the chief ministers meeting print politics news asj