हिंगोली : लोकसभा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी हिंगाेली शहरभर ‘ कावड’ यात्रेची फलकबाजी करुन शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील विविध चौकात लावलेल्या कावड यात्रेच्या फलकांची संख्या एवढी अधिक आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभेची जाहिरात करण्यासही जागा मिळू नये, असा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंगाेली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा अनेक वर्षे वरचष्मा होता. स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत पाटील यांनी १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पुढील निवडणुकीत कॉग्रेसच्या उत्तमराव राठोड यांनी काळ गाजवला. मात्र, विलास गुंडेवार, शिवाजीराव माने, सुभाष वानखडे, हेमंत पाटील हे शिवसेनेचे यांनी शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत.. यातील विलास गुंडेवार यांनी पुढे कॉग्रेसमध्ये प्रवेश मिळविला. पुढे त्यांचा शिवाजीराव माने यांनी पराभव केला. शिवाजीराव माने आता भाजपमध्ये आहेत. या पूर्वी त्यांनी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास केला आहे. सुभाष वानखेडे हेदेखील कॉग्रेस, भाजप आणि शिवसेना असा प्रवास करुन आता ठाकरे गटात आहेत. तर खासदार हेमंत पाटील यांनी सत्ताधारी शिंदे गटात जाणे पसंत केले. या पार्श्चभूमीवर उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्ट रोजी होणारी सभा राजकीय अर्थाने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीला पोषण व्हावे म्हणून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कावड यात्रेचा उपयोग करण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा… ‘एकला चलो’तून मायावतींचे काँग्रेसशी छुप्या युतीचे संकेत?

हेही वाचा… ठाणे जिल्हा नियोजन समितीला पालकमंत्र्यांची प्रतीक्षाच

२८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या यात्रेसाठी कळमनुरी येथील महादेव मंदिरापासून हिंगोली शहरला लागून असलेल्या महादेव मंदिरापर्यंत पदयात्रा काढली जाते. बॅन्ड पथके, भजन करत लोक यात्रेत सहभागी होत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. या वर्षी ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बांगर यांच्या समर्थकांच्या मते शहरातील प्रत्येक वीज खांबावर, विश्रामगृहासमोर चौकात तसेच महात्मा गांधी पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा, अग्रसेन महाराज पुतळा चौकात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते नगरपालिका कार्यालय या मुख्य रस्त्यावर बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे ठाकरे गटाला सभेचे बॅनर कोठे लावावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कावड यात्रेत गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या यात्रे दरम्यान २०१९ मध्ये दगडफेकही झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बांगर यांना यश मिळाले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटला डिवचण्यासाठी फलकबाजी केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before uddhav thackeray hingoli tour mla santosh bangar from shinde group placed flexes hoarding for kawad yatra print politics news asj